"बरळत 'रा(ह)णे' तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे", ठाण्यात झळकले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 12:35 PM2021-08-25T12:35:13+5:302021-08-25T12:37:58+5:30

ठाण्यात आज ठिकठिकाणी राणेंवर झालेल्या कारवाईच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी राणेंना डिवचण्यासाठी पोस्टर लावले आहेत. 

posters in thane against narayan rane after controversial statement about cm uddhav thackeray | "बरळत 'रा(ह)णे' तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे", ठाण्यात झळकले पोस्टर

"बरळत 'रा(ह)णे' तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे", ठाण्यात झळकले पोस्टर

Next

Narayan Rane: राज्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल दुपारी पालिसांनी अटक केली होती. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना महाड पोलिसांनी जामीनही मंजूर केला. यासर्व घडामोडीं दरम्यान राज्यभर राणेंविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलनं केली. आज ठाण्यात याचा दुसरा अंक पाहायला मिळतोय. ठाण्यात आज ठिकठिकाणी राणेंवर झालेल्या कारवाईच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी राणेंना डिवचण्यासाठी पोस्टर लावले आहेत. 

ठाण्यातील मुख्य रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर हे पोस्टर झळकत असून यात ''बरळत 'रा(ह)णे' तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे...आज, उद्या, कधीही...मा. उद्धवजींसोबतच.", असा आशय छापण्यात आला आहे. पोस्टरवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नावं आहेत. या दोन्ही नेत्यांकडून हे पोस्टर ठाण्यातील उड्डाणपुलांवर लावण्यात आले आहेत. 

राणेंना झालेली अटक म्हणजे त्यांना देण्यात आलेला राजकीय शह असल्याचं या पोस्टरमधून शिवसैनिकांकडून दाखवून देण्यात आलं आहे. त्यामुळे या पोस्टरची चांगलीच चर्चा ठाण्यात सुरू आहे. 

राणेंना अटक आणि जामीन
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्याविरोधात नाशिक, महाड येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राणेंच्या अटकेचे आदेश निघाले होते. त्यानुसार काल दुपारी राणे यांना संगमेश्वर येथील एका गावातून रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं व महाड पोलिसांनी त्यानंतर राणेंना अटक केली होती. राणेंना अटक केल्यानंतर महाड येथील कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं. कोर्टानं त्यांना जामीन मंजुर करत त्यांची सुटका केली होती. यावेळी कोर्टासमोर राणेंनी यापुढे अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असं लेखी दिलं आहे. त्यामुळे नाशिकमधल्या अटकेचा निर्णय बदलून आता राणेंना नाशिकच्या पोलीस ठाण्यात केवळ जबाब नोंदविण्यासाठी उपस्थित राहावं लागणार आहे. तशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. 

Web Title: posters in thane against narayan rane after controversial statement about cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.