शिवसेना, भाजप नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजुर पोस्ट करणे पडले महागात; ठाणे पोलिसांनी सांगलीतून एकाला केली अटक
By अजित मांडके | Published: June 10, 2023 04:25 PM2023-06-10T16:25:37+5:302023-06-10T16:26:20+5:30
याबाबत ठाणे शिवसेना सचिव दत्तात्रय गवस यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ठाणे : शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप नेत्यांच्या विरोधात सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकुर प्रसारीत करणाऱ्या युवा सेनेच्या (उबाठा) पदाधिकाऱ्याला सांगलीतून ठाणेपोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव प्रवीण पवार (३०) असे असून तो आदीत्य ठाकरे यांचा फोटा असलेल्या युवा सेना महाराष्ट्र या पेजवरुन केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करीत होता. याबाबत ठाणे शिवसेना सचिव दत्तात्रय गवस यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
युवासेना महाराष्ट्र राज्य या फेसबुक खात्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र प्रसारित करण्यात आले होते. ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे ठाणे शहर सचिव दत्तात्रय गवस यांना हे मजकूर फेसबूकवर निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या मजकुरावरून आमच्या भावना दुखावल्या असल्याचे गवस यांनी पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेची दखल घेत नौपाडा पोलिसांनी तपास केला असता हा मजकूर सांगली येथील कडेगाव मधील प्रवीण पवार याने प्रसारित केला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सांगली येथून प्रवीणला ताब्यात घेऊन अटक केली. प्रवीण हा ठाकरे गटाचा पादाधिकरी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.