ग्रामसेवकांच्या असहकार आंदोलनाला मोखाड्यात स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:13 PM2019-08-08T23:13:37+5:302019-08-08T23:13:40+5:30
जिल्ह्यात इतरत्र सुरुवात; आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने घेतला निर्णय
मोखाडा : राज्यातील जवळपास २२ हजार ग्रामसेवकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी ९ आॅगस्ट रोजी राज्यभरातील ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार होते. परंतु, जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असल्याने सामाजिक बांधिलकी जपत पहिल्या टप्प्यातील राज्यव्यापी असहकार आंदोलनाला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली आहे. याबाबतची माहिती ग्रामविकास अधिकारी किशोर सोनावणे यांनी ‘लोकमत’ला दिली. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करु न पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावे, ग्रामसेवकांना प्रवासभत्ता सरकारी निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, ग्रामसेवकांसाठी शैक्षणिक पात्रता बदलून पदवीधर ग्रामसेवकांची नियुक्ती करावी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वेतन त्रूटी दूर कराव्यात, २००५ नंतर नियुक्त ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढ व एक गाव एक ग्रामसेवक धोरण राबवावे, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करावीत, अशा काही मागण्या आहेत.
असे असेल असहकार आंदोलन
१३ आॅगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येतील. १६ आॅगस्ट रोजी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन, १८ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर लक्षवेध आंदोलन, २० आॅगस्ट रोजी मंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिवांच्या निवासस्थानांसमोर एक दिवसीय उपोषण करण्यात येईल. २१ आॅगस्टला मुख्यमंत्री, सर्व मंत्र्यांना भेटून निवेदने देण्यात येतील. यानंतर मात्र २२ आॅगस्टपासून संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
डहाणूत आंदोलनास सुरुवात
डहाणू : डहाणूत आज ग्रामसेवक संघटनेमार्फत विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन सुरू करून डहाणू तालुका अध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी बी.एच.भरकसे यांना निवेदन दिले. आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.