विज्ञान पार्कआणि शहरी जंगल प्रकल्पाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:53 AM2020-02-22T00:53:46+5:302020-02-22T00:53:57+5:30
ठामपा प्रशासनाने दिशाभूल केल्याचा आरोप : नगरसेवकांच्या विरोधानंतर महापौरांचा निर्णय
ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेल्या ढोकाळी येथील विज्ञान पार्क आणि शहरी जंगल उभारण्याच्या प्रकल्पाला गुरु वारच्या महासभेत महापौर नरेश म्हस्के यांनी स्थगिती दिली. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रकल्पास विरोध दर्शवत, याबाबतचा प्रस्ताव सादर करताना प्रशासनाने दिशाभूल केल्याचा आरोपही केला.
ढोकाळी येथील सुविधा भूखंडावर क्रीडांगणाचे आरक्षण टाकण्याच्या प्रस्तावाची सूचना २०१७ मध्ये मंजूर करण्यात आली. तरीही कुणालाही विश्वासात न घेता पालिका प्रशासनाने त्याच जागेवर विज्ञान पार्क आणि शहरी जंगल उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांचा विरोध होता. हा प्रस्ताव दिशाभूल करून आणण्यात आल्याचा आरोप करत त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. ढोकाळी भागात आधीच ३० एकरांचा भूखंड सेंट्रल पार्क उभारण्याच्या नादात विकासकाच्या घशात घालण्यात आला आहे. इतर सुविधा भूखंडही याचपद्धतीने विकासकांच्या भल्यासाठी विकले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी केला. पालिकेच्या बिल्डरधार्जिण्या धोरणामुळे मैदान शिल्लक राहिले नाही. त्यामुळे ढोकाळी येथील विज्ञान पार्क आणि शहरी जंगल प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. ढोकाळी भागात कलरकेम कंपनीच्या सुविधा भूखंडावर क्रीडांगण उभारण्याच्या प्रस्तावाची सूचना २०१७ साली महासभेत मंजूर करण्यात आली होती. त्यामुळे आरक्षण बदलून कोणत्या नियमाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे, असा सवाल भोईर यांनी केला.
अर्थसंकल्पातील प्रस्तावाला होता विरोध
हा प्रकल्प उभारताना प्रशासनाने दिशाभूल केली. ठाण्यात मुलांना खेळण्याकरिता मैदान शिल्लक नाही. त्यामुळे आहे त्या मैदानाचा वापर पार्क उभारण्याकरिता करणे चुकीचे असल्याचा आरोप नगरसेवक संजय भोईर यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी हा प्रकल्प एका बिल्डरच्या वास्तुविशारदाच्या सल्ल्याने उभा राहत असल्याचा आरोप केला. तशी कागदपत्रेच त्यांनी सभागृहासमोर सादर केली.
यावर प्रशासनाला उत्तर मागताच अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर, त्यांचा आरोप खरा असल्याचे प्रशासनाने मान्य केले. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध करत हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली.