मार्चमध्येच आदिवासी महिलांच्या डोक्यावर हंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:53 AM2021-03-09T00:53:49+5:302021-03-09T00:54:15+5:30
मोखाडा तालुक्यात भीषण पाणीटंचाई
रवींद्र साळवे
मोखाडा : पालघर जिल्ह्यात पाणीटंचाईची पहिली ठिणगी डिसेंबर महिन्यात मोखाड्यातील दापटी-१ व २ या गावांतून पडली आहे. यासह अन्य १८ गावपाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यामधील १० गावपाड्यांचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाने मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा दापटीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर मंजुरीसाठी पडून आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात येथील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर वणवण पायपीट करावी लागत आहे.
मोखाडा तालुक्यात प्रतिवर्षी फेब्रुवारीपासून पाणीटंचाईला सुरुवात होते. १०० हून अधिक गावपाडे पाणीटंचाईने होरपळतात. मात्र, यंदा दोन महिने अगोदरच तालुक्यातील दापटी-१ व दापटी-२ या दोन गावांमध्ये डिसेंबर २०२० मध्येच पाणीटंचाई जाणवू लागली. यामुळे येथील आदिवासींनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. सद्य:स्थितीत मोखाड्यातील १८ गावपाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईग्रस्त गावपाड्यांची पाहणी केल्यानंतर मोखाडा तहसीलदार कार्यालयाने दापटी-१ व दापटी-२ या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव १७ व २० डिसेंबर २०२० ला जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.
शासनाच्या धोरणानुसार टंचाईग्रस्त गावपाड्यांनी, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करताच त्याची २४ तासांत तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करून ४८ तासांत टँकरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, दापटी गावांचे प्रस्ताव गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात साहेबांच्या टेबलावर
पडून आहेत.
तालुक्यातील १८ गावपाड्यांत टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी
तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने सध्या १८ गावपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यांनीही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती तहसीलदार वैभव पवार आणि गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांनी दिली आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एकाही प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्याने मोखाड्यातील आदिवासी महिला रणरणत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पायपीट करीत आहेत.
मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन, टंचाईग्रस्त गावपाड्यांना मंजुरी देऊन, टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. मात्र, तीन महिने होऊनही दापटी गावांचे प्रस्ताव तेथेच पडून आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येथील आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे गतसालाप्रमाणे टंचाईग्रस्त गावपाड्यांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थानिक तहसीलदारांना द्यावेत, अशी मागणी आपण पालकमंत्र्यांकडे केली आहे.
- प्रकाश निकम,
जिल्हा परिषद सदस्य, पालघर.
मोखाड्यातील टंचाईग्रस्त गावपाडे
दापटी-१, दापटी-२, धामणी, कुंडाचापाडा, स्वामीनगर, धनगरेवाडी, डोंगरवाडी, हेदवाडी (पाथर्डी), ठवळपाडा, पिंपळपाडा (खोच).