वाडा तालुक्यात आता भाताशी स्पर्धा करतो आहे बटाटा
By admin | Published: January 6, 2016 12:58 AM2016-01-06T00:58:55+5:302016-01-06T00:58:55+5:30
सध्याच्या तरूणांचा ओढा हा नोकऱ्यांकडे अधिक असतो. शेतीपेक्षा ते नोकरीला जास्त प्राधान्य देतात. मात्र वाडा तालुक्यातील काही तरूणांनी एकत्र येऊन आपआपल्या शेतात प्रायोगिक
वसंत भोईर, वाडा
सध्याच्या तरूणांचा ओढा हा नोकऱ्यांकडे अधिक असतो. शेतीपेक्षा ते नोकरीला जास्त प्राधान्य देतात. मात्र वाडा तालुक्यातील काही तरूणांनी एकत्र येऊन आपआपल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकर क्षेत्रात बटाट्याची लागवड केली आहे. या लागवडी बरोबरच ऊस, केळी, आले, पपई अशी पिके घेण्याचा त्यांचा मानस या तरूण शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून ते कृषी क्रांती करू पाहत आहेत.
वाडा तालुक्याला'भाताचे कोठार' म्हणून संबोधले जाते. येथील' वाडा कोलम ' हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारा पेठेतही त्याला मोठी मागणी आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे भात शेती दर वर्षी तोट्यात जात असल्याने हळूहळू येथील शेतकरी आता भाजीपाला, फुलशेती याकडे वळवला आहे. त्याच बरोबर आता तर बटाटा, केळी, ऊस, पपईची लागवड येथील शेतकरी करीत आहे.
तालुक्यातील तरूण शेतकऱ्यांनी 'शांतीदूत ग्रुप फामिॅग' या संस्थेची स्थापना केली असून तिचे दोनशे पन्नास तरूण शेतकरी सदस्य झाले आहेत. यापुढे पुढील वर्षांत ३ हजार ५०० शेतकरी सदस्य करण््याचा त्यांचा विचार असून येथे 'कृषी क्रांती' करण्याचा मानस आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना भातपीका ऐवजी इतर पिकांचा पर्याय सर्व मार्गदर्शनासह देऊन स्वावलंबी बनविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यातील देवघर, गांध्रे, ढाढरे, कांबारा, घोडमाळ, आंबिस्ते , पालसई, विलकोस, निचोळे, वावेघर, शेलटा, बोरांडा या गावात सुमारे २५ एकर जागेत या वर्षी बटाट्याची लागवड केली आहे. बटाट्याची लागवड थंडीच्या काळात केली जाते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही लागवड केली असून हे पीक आता हिरवेगार बहरले आहे.
त्यासाठी सर्व प्रथम जमिनीची नांगरणी केली जाते. नंतर वाफे तयार करतात. त्यानंतर पाणी देऊन ते भिजवले जातात. ते पुन्हा सुकवून दोन ते तीन दिवसात आठ इंच अंतरावर व चार इंच खोलीवर बटाट्याची लागवड केली जाते. येथील वातावरण, हवामान व जमिन या पिकासाठी योग्य असल्याचे येथील शेतकरी सांगतात. या पिकाला कमी पाणी लागते. तसेच औषधे, खते, मजुरीचा खर्च अंत्यत कमी असतो. तसेच शेणखताचा जास्त मारा दिल्यास अधिक चांगले असते.
या पिकावर रोगाचा प्रार्दुभाव होण्याचे प्रमाण कमी असते. चार ते पाच मजूर सर्व पिकाची लागवड तसेच देखभाल करू शकतात. त्यामुळे या पिकाला मजूरीचा खर्च फारसा होत नाही. निबोंली मेन्टस व १८:१८ :१८ या खताचा वापर यासाठी केला जातो. एक एकर जागेत ७०० ते ८०० किलो बियाणे लागते. एकरी २३ हजार झाडे बसतात. त्याचे उत्पन्न १० ते १४ टनापर्यंत येते. एका एकराला १ लाख ४० हजारापर्यत मिळू शकते. या पिकावर करपा व बुरशी जन्य रोग पडू शकतात. मात्र औषध वेळेवर मारल्यास ते टाळता येतात. हे पिक वेफर्ससाठी ९० दिवसात तयार होते तर भाजीसाठी ७५ दिवसात तयार होते. येथील तरूण शेतकरी व कुणबी सेनेचे नेते प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली शांतीदूत ग्रुप फामिॅगची स्थापना करण्यात आली आहे. बटाटे शेतीसाठी बि - बियाणे तज्ञ गणेश पवार व तज्ञ शेतकरी अरूण मोरे, परदेशातील तज्ञही या शेतीसाठी मार्गदर्शन करीत आहे. वेळोवेळी ते प्रत्यक्ष पाहणीही करीत आहेत. तसेच समूह मार्गदर्शनाचाही लाभ देत आहेत. कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतात काय झाले याची माहिती शेतकरी देतात त्यानंतर लगेच त्यावर उपाययोजना होत आहे. प्रफुल्ल पाटील यांनी देवघर येथे स्वत: २ एकर जागेत बटाट्याची लागवड केली असून हे पीक आत्ता पर्यंत समाधानकारक आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही शेती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या तरूणांचा शेतीकडे बघणाच्या दृष्टिकोन वेगळा आहे. बटाटेशेती, ऊस, आले, पपई शेती आपण केली तर नोकरीपेक्षा जास्त पैसे आपण कमावू शकतो. असा आत्मविश्वास त्यांना आहे.