मॅरेथॉन मार्गावर खड्ड्यांची स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:17 AM2018-08-25T00:17:43+5:302018-08-25T00:18:45+5:30
तत्काळ बुजवण्याचे महापौरांचे आदेश; प्रशासनाची २ सप्टेंबरची डेडलाइन
ठाणे : येत्या २ सप्टेंबर रोजी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रंगणार आहे. शहरातील रस्त्यांची खड्ड्यांनी पार चाळण केली असून, त्यामुळे यंदासुद्धा या स्पर्धकांना खड्ड्यांतूनच मार्ग काढून स्पर्धा जिंकावी लागणार आहे.
येत्या २ सप्टेंबर रोजी २९ वी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रंगणार आहे. दरवर्षी या स्पर्धेत २० ते २५ हजार स्पर्धक सहभागी होतात. त्यात अनेक स्पर्धकांना रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. पराभूत स्पर्धकांनी या खड्ड्यांवर अपयशाचे खापर फोडल्याचे प्रकार यापूर्वी बरेचदा घडले आहेत. रस्त्यांची ही दूरवस्था यावेळीही कायम आहे; उलटपक्षी कितीतरी पटीने वाढली आहे. शहरातील रस्त्यांच्या या दूरवस्थेबाबत सर्वस्तरावर ओरड झाली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्याचा फटका आता महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला बसणार आहे.
यंदा खड्डेमुक्त स्पर्धा व्हावी, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने शुक्रवारी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मॅरेथॉनच्या सर्वच मार्गांची पाहणी केली. या पाहणीमध्ये जवळजवळ सर्वच मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून आले. त्यामुळे स्पर्धेपूर्वी ते बुजवण्यात यावेत, असे आदेश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहे. या पाहणी दौऱ्यात उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदींसह पालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाविषयी सर्वत्र नाराजी
घोडबंदरचा सर्व्हिस रस्ता पूर्णपणे उखडला आहे. काही ठिकाणी पाण्याच्या वाहिन्या फुटल्या असून केबल वर आल्या आहेत. त्यामुळे या मार्गांवर स्पर्धकांनी धावायचे कसे, असा सवाल करून महापौरांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली.
या मार्गावरील वागळे डेपो, साठेनगर, इंदिरानगर चौक, सावरकरनगर, कोरस चौक, रुणवाल, देवदया ते नीलकंठ, पोखरण रोड नं. २, मानपाडा सेवारस्ता, हिरानंदानी इस्टेट प्रवेशद्वार येथे खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे महापौरांनी तत्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले.