7 कोटी खर्च करुनही भिवंडीतील उड्डाणपुलावर खड्डयांचे साम्राज्य; ठेकेदारावर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 05:30 PM2021-06-23T17:30:41+5:302021-06-23T17:34:04+5:30
Bhiwandi News : भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून स्व. राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये उभारण्यात आला.
नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण नाका ते पट्टीनाक्यावरील जोडणाऱ्या स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी या पुलाच्या दुरुस्तीवर लाखों रुपयांचा निधी खर्च करूनही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुलावरील खड्ड्याने पुन्हा डोकेवर काढल्याने आतापर्यंतचा कोट्यवधींचा निधीही खड्ड्याच गेल्याची चर्चा या पुलावरून जाणारे वाहनचालक करताना दिसत आहे.
भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून स्व. राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये उभारण्यात आला. विशेष म्हणजे हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच कमकुवत असून तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी तो बंद केला आहे. मागील दोन महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सात कोटी रुपये खर्च केले असून अजूनही दिखाव्यासाठी हे दुरुस्ती काम सुरूच आहे. मात्र अजूनही उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला नसून या उड्डाणपुलावर पडलेले खड्डे हे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. हा उड्डाण पूल सुरुवातीपासून नादुरुस्त असल्याने याच्या डागडुजीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे.
तीन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाला भगदाड पडल्याने हा पूल अवजड वाहनांसाठी बंद केला आहे. तर या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून सुमारे सात कोटी रुपये मंजूर झाल्यावर येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीस सुरुवात झाली. परंतु केवळ कल्याण नाक्यावरून धामणकर नाका दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे दुरुस्ती पूर्ण झाली. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित भागातील दुरुस्ती रखडली असून आता या उड्डाणपुलावर मोठ मोठे खोल खड्डे पडल्याने या उड्डाणपुलावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी व हलक्या वाहनचालक मेटाकुटीला आले असून या खड्ड्यांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत. तर खड्ड्यात आपटून वाहने नादुरुस्त होत असल्याने चालकांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र पुलावर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्तीकडे भिवंडी महानगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून लवकरात लवकर उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांसह चालकांकडून केली जात आहे.