डोंबिवलीतील 'फ' प्रभाग सभापतींच्या वॉर्डात खड्डेच खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 07:10 PM2019-08-08T19:10:04+5:302019-08-08T21:08:08+5:30
डोंबिवली येथील भगतसिंग रस्त्यावर महापालिकेच्या कॉर्नरपासून ते टिळकपथापर्यंत सव्वाशे खड्डे असून त्या लहानमोठ्या खड्डयांमुळे वाहनचालक जेरीस आले आहेत.
डोंबिवली - येथील भगतसिंग रस्त्यावर महापालिकेच्या कॉर्नरपासून ते टिळकपथापर्यंत सव्वाशे खड्डे असून त्या लहानमोठ्या खड्डयांमुळे वाहनचालक जेरीस आले आहेत. शहरातील वाहनचालकांनीच खड्डे मोजल्यानंतर ही माहिती दिली. मानपाडा रस्त्याएवढेच भगतसिंग रस्त्यालाही महत्व आहे. परंतू कल्याण डोंबिवली महापालिका मानपाड्याच्या तुलनेत या रस्त्याच्या डागडुजीकडे तुलनेने कमी लक्ष देत असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. फ प्रभाग समितीचे सभापती, शिवमार्केटचे नगरसेवक विश्वदीप पवार यांच्या प्रभागात हा रस्ता येतो.
खड्डयांची समस्या ही दरवर्षीची असून सातत्याने डांबरीकरण केल्याने मुळ रस्त्याची उंची वाढली आहे. त्यामुळेही अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची समस्या होते. त्याचा त्रास वाहनचालकांना होतो. या रस्त्यावरुन महापालिकेच्या निवासी विभागात, तसेच कल्याण, दावडी आदी भागात जाणा-या परिवहन विभागाच्या बसेस, स्कूल बस, बहुतांशी रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने, अन्य अवजड वाहनांची रात्रंदिवस वर्दळ सुरु असते. मात्र आठवडाभरापासून पडणा-या पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क होत असून वाहतूक विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. ठिकठिकाणी ६ इंच खड्डे पडल्याने महापालिकेच्या रस्ते विभागाचे काम करणा-या अभियंत्यांची पोलखोल झाली आहे. शहरातील टिळक पुतळयाजवळचा ते मशाल चौक हा रस्ता सोडला तर एकही रस्ता धड नाही, ठिकठिकाणी डांबरी रस्त्यांवर वाहनचालकांना समस्या भेडसावत आहे. त्यामुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले असून वाहनांच्या दुरुस्तिच्या खर्चात वाढ झाली आहे, अनेकांना कंबरदुखी जडली आहे. खड्डे पडले की, खडी, चिकन माती टाकण्यात येत असून त्याचा काहीही फायदा नसल्याचे उघडकीस आले आहे. पावसाच्या जोरदार सरी आल्या की खडी रस्त्यावर इतरत्र पसरत असून वाहनचालकांचे अपघात होण्याची शक्यता आहे.
ही तर महापालिकेची धुळफेक
रोलर आणुन खडी टाकून तात्पुरता खड्डा बुजवून काहीही होत नाही. त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने दर्जेदार काम करणे आवश्यक आहे, अन्यथा ही सगळी थुंकपट्टी असून आठवडभरात त्या रस्त्यावर भयंकर खड्डे पडले आहेत. खडी टाकून खड्डे बुजवणे ही नागरिकांच्या डोळयात सरळ सरळ धुळफेक असल्याचा संताप वाहनचालकांनी व्यक्त केला. त्या खडींमुळे दुचाकी वाहनचालकांचे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. - अलंकार तायशेटे, आर्किटेक - त्रस्त वाहनचालक, डोंबिवली पूर्व
भगतसिंग रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्डे पडले आहेत ही वस्तूस्थिती आहे. त्यासंदर्भात महापालिकेच्या अभियंत्यांना बुधवारी पत्र दिले आहे. आगामी काळातील दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र या पाठोपाठ येणा-या सणांमध्ये कोणताही अपघात होऊ नये, तसेच दैनंदिन वाहन चालवतांना वाहनाचालकांना त्रास होऊ नये, अशा स्वरुपात दर्जात्मक काम करुन रस्ता सुधारण्यासाठी पत्रात नमूद केले आहे - विश्वदीप पवार,सभापती, फ प्रभाग समिती