सात दिवसांत बुजवणार खड्डे , एमएसआरडीसीचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 03:14 AM2018-07-13T03:14:19+5:302018-07-13T03:14:38+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दीड महिन्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची गंभीर दखल घेत आयुक्त गोविंद बोडके यांनी गुरुवारी बैठक घेतली.
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दीड महिन्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची गंभीर दखल घेत आयुक्त गोविंद बोडके यांनी गुरुवारी बैठक घेतली. त्यावेळी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या २३ किलोमीटरच्या रस्त्यांवरील खड्डे सात दिवसांत बुजवण्याचे आश्वासन दिले.
केडीएमसी हद्दीतील एमएसआरडीसीचे रस्ते आहेत. शिवाजी चौकातील रस्त्याच्या उंचसखल भागामुळे आरव आतराळे व मनीषा भोईर यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जागरूक नागरिक आणि मनसेने आयुक्तांना जाब विचारला होता. कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांनी रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडला.
आयुक्त बोडके यांनी १२ जुलैला बैठक घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार, गुरुवारी झालेल्या बैठकीस महापौर विनीता राणे, स्थायी समिती सभापती राहुल दामले, पोलीस उपायुक्त संजय शिंदे, एमएसआरडीसीचे अभियंता आर.एस. जायस्वार, एमआयडीसीचे अभियंता संजय ननावरे, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एमएसआरडीसीचे जायस्वार यांनी सात दिवसांत खड्डे बुजवले जातील, असे स्पष्ट केले. महापालिका हद्दीतील अन्य रस्त्यांवरील खड्डेही बुजवण्यात यावेत, असे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागास दिले आहेत.
शीळ-कल्याण-भिवंडी रस्त्याचे चौपदरीकरण करताना २६८ कोटी रुपयांचा दुसरा टप्पा करण्यात येणार होता. मात्र, नंदी पॅलेस ते कचोरे, रेल्वेमार्ग, खाडी आणि पुढे नाशिक हायवे, असा हा दुसरा टप्पा एमएसआरडीसीने केला नाही. त्याला वेळ लागेल, असे सांगून महापालिकेच्या डीपीतील बाह्यवळण रस्ता करून घेतला. त्यांची एनओसी रद्द केलेली असताना शहरातील रस्ता वापरला जात आहे. रस्ते अपघात व कोंडीच्या घटनांमुळे पालिका बदनाम होते. एमएसआरडीसीने टप्पा दोन पूर्ण न करता महापालिकेची फसवणूक केली. हा टप्पा पूर्ण न करताच टोलवसुली केली जात आहे, याकडे दामले यांनी लक्ष वेधले. त्यावर वरिष्ठांना कळवू, असे अधिकाºयांनी सांगितले. दुर्गाडी खाडीवरील नव्या पुलाचे काम संथगतीने सुरू आहे, असे दामले म्हणाले. पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती जायस्वार यांनी दिली आहे.
खडीकरणाची मात्रा ठरतेय निरुपयोगी
डोंबिवली : दमदार पडलेल्या पावसामुळे येथील पूर्वेकडील टिळक चौक ते मंजुनाथ विद्यालयापर्यंतच्या रस्त्याची पूर्णत: चाळण झाली आहे. खड्डे बुजवण्यासाठी केडीएमसीतर्फे राबवली जात असलेली खडीकरणाची मात्रा निरुपयोगी ठरत आहे. त्यामुळे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’, असे चित्र येथे पाहावयास मिळत आहे. खड्ड्यांमधून मार्ग काढणे वाहनचालकांसाठी जिकिरीचे होऊन बसले असताना खडीवरून वाहने घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल ते टिळक चौक हा महत्त्वाचा रस्ता आहे.
याच रस्त्यातील टिळक चौक ते मंजुनाथ विद्यालयापर्यंतच्या भागाचे काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण झाले. मंजुनाथ विद्यालय ते टिळक चौकपर्यंतच्या मार्गिकेसाठी मास्टिक पद्धत वापरण्यात आली. तर, टिळक चौक ते ‘मंजुनाथ’ पर्यंतच्या मार्गिकेसाठी नेहमीचीच पद्धत वापरण्यात आली. परंतु, मागील काही दिवसांत झालेल्या दमदार पावसाने या रस्त्याच्या कामाची एक प्रकारे पोलखोल केली आहे. प्रारंभी टिळक चौकात खड्डे पडायला सुरुवात झाली. आता तर मंजुनाथ विद्यालयापर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
महापालिकेने वाळूमिश्रित खडी टाकून खड्डे बुजवले. मात्र, ही खडी वाहनांच्या वर्दळीमुळे पुरती उखडली गेली आहे. त्यामुळे हे खडीकरण एक प्रकारे निरुपयोगी ठरले आहे. वाळूदेखील बाहेर पडल्याने वाहने घसरण्याचा धोका अधिक वाढला आहे. सध्या पाऊस पडत असल्याने खडीकरणाशिवाय पर्याय नाही. जर पाऊस थांबून ऊन पडले तर डांबरीकरणाचे काम तातडीने हाती घेतले जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मनसेने ६ जुलैला येथे आंदोलन छेडले होते. पण, त्यानंतरही परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही.
‘गॅरेजवर कारवाई करा’
शहरातील रस्त्यालगत असलेले गॅरेजवाले त्यांची वाहने दुरुस्तीसाठी रस्त्यावर उभी करून ठेवतात. त्यामुळेही रस्ता पुरेसा वापरता येत नाही. परिणामी, वाहतूककोंडी होते. महापालिका व वाहतूक नियंत्रण शाखेने गॅरेजवाल्यांच्या विरोधात संयुक्त कारवाई करण्याचे पोलीस उपायुक्त शिंदे यांनी सूचित केले आहे.