दहिसर-चेकनाका महामार्गावर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत मोठी भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:42 AM2021-07-28T04:42:41+5:302021-07-28T04:42:41+5:30
मीरा रोड - दहिसर चेकनाका येथील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील वाहतूक कोंडीत मोठी भर पडली आहे. येथील खड्डे बुजविण्यासह ...
मीरा रोड - दहिसर चेकनाका येथील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील वाहतूक कोंडीत मोठी भर पडली आहे. येथील खड्डे बुजविण्यासह लगतची फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीसाठी वाहतूक पोलीस विविध विभागांचा पाठपुरावा करीत असताना दुसरीकडे हे विभाग मात्र एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करती असल्याने समस्या मात्र कायम आहे.
मुंबईचे उत्तरेकडील प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेकनाका येथील टोलनाक्यामुळे रोजची वाहतूक कोंडी असते. त्यात आता महामार्गावरील खड्ड्यांतून रस्ता शोधणे वाहनचालकांना कठीण होत असल्याने येथील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. परिणामी वाहतूक काेंडी होते. खड्डे मोठे व खोल असल्याने कसरत करीत वाहने चालवावी लागतात, तसेच खूपच धीम्या गतीने पुढे न्यावी लागतात. परिणामी वाहनांच्या रांगा लागत आहेत. कधी कधी तर या रांगा मीरा रोडच्या प्लेझंट पार्कपर्यंत, तर महामार्गावर घोडबंदरपर्यंत लागतात.
एक ते दोन तास वाहनचालक येथेच अडकून पडतात. येथील खड्डे बुजविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आय. आर. बी., राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मेट्रोचे काम करणाऱ्या जे. कुमार व एमएमआरडीए, तसेच मीरा-भाईंदर महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा चालविला आहे; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून ते सर्व एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत. त्यातच या ठिकाणी असलेली महापालिकेची जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी फुटल्याने त्यातून वाहणारे पाणी हे रस्त्यावर व खड्ड्यांमध्ये साचून राहते. मध्यंतरी खड्डे भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यामुळे पुन्हा खड्डे निर्माण झाले. यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाहतूक पोलिसांनी सातत्याने संपर्क साधून जलवाहिनी दुरुस्त करण्यास कळविले आहे; परंतु त्यालाही आठवडा उलटून गेला आहे.
--------------
दहिसर चेकनाका कमानीखाली महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे व जलवाहिनी फुटल्याने साचणारे पाणी याबाबत महापालिकेसह संबंधित विभागांशी चर्चा सुरू आहे. पालिकेने जलवाहिनी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. जलवाहिनी दुरुस्त होताच खड्डे भरण्याचे काम केले जाईल, असे संबंधित विभागाने कळविले आहे. वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेता सकाळी गर्दीच्या वेळी विरुद्ध दिशेची एक मार्गिका वाहनांसाठी खुली केली आहे.
- रमेश भामे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा