माजिवडा, कापुरबावडी उड्डाणपुलांवर पडले खड्डे, वाहतुकीचा वेग मंदावला
By अजित मांडके | Published: June 22, 2024 03:03 PM2024-06-22T15:03:40+5:302024-06-22T15:03:51+5:30
पावसाळा सुरु झाला आणि रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे.
ठाणे : पाऊस सुरु होत नाही तोच खारेगाव टोलनाक्यावर रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यानंतर आता पावसाळ्यापूर्वी माजिवडा, कापुरबावडी उड्डाणपुलावर मुलामा लावून सुद्ध त्याठिकाणी नाशिककडे जाणाऱ्या मुंबईकडे येणाऱ्या आणि घोडबंदरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे येथून वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. त्यातही याठिकाणी वाहन चालकांचा वेगही मंदावल्याचे चित्र आहे.
पावसाळा सुरु झाला आणि रस्त्यांना खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. ठाण्यात यंदा खड्डे पडणार नसल्याचे बोलले जात होते. महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यांना तुर्तास खड्डे पडले नसल्याचे सुखावह चित्र असले तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या असलेल्या माजिवडा, कापुरबावडी उड्डाणपुलांवर खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे. कापुरबावडीचा उड्डाणपुल चढल्यानंतर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तर पुढे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनीवर देखील खड्डे पडल्याचे दिसत आहेत. त्यातही ही मार्गिका संबधित विभागाकडून पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यात आली होती.
एका मार्गिकेवर मास्टीकही टाकण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची पोलखोल या निमित्ताने झाली आहे. त्यातही हे खड्डे मोठ्या आकारचे असल्याचे दिसत आहे. या खड्यांमुळे वाहतुकीचा वेगही काहीसा मंदावल्याचे दिसत आहे. दुसरीकडे कापुरबावडी पासून घोडबंदरकडे जाणाºया सेवा रस्त्यांवर देखील विविध ठिकाणी छोटे मोठे खड्डे पडू लागले आहेत. या रस्त्याचे कामही पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते. परंतु आता त्या रस्त्यांना देखील खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे.