दहिसर चेक नका येथील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत मोठी भर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 03:24 PM2021-07-27T15:24:52+5:302021-07-27T15:25:09+5:30
मुंबईचे उत्तरेकडील प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेकनाका येथील टोलनाक्या मुळे रोजची वाहतूक कोंडी आधीच सर्वसामान्य नागरिकांसाठी जाचक ठरली आहे.
मीरा रोड - दहिसर चेकनाका येथील टोलनाका मुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी नागरिकांना जाचक ठरली असतानाच महामार्गावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे या वाहतूक कोंडीत मोठी भर पडली आहे. येथील खड्डे बुजवण्या सह लगतची फुटलेली जलवाहिनी दुरुस्ती साठी वाहतूक पोलीस विविध विभागांचा पाठपुरावा करत असताना दुसरीकडे हे विभाग मात्र एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करत असल्याने समस्या कायम आहे.
मुंबईचे उत्तरेकडील प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेकनाका येथील टोलनाक्या मुळे रोजची वाहतूक कोंडी आधीच सर्वसामान्य नागरिकांसाठी जाचक ठरली आहे. या टोल नाक्यावर होणारी वाहनांची प्रचंड गर्दी नित्याची आहे. टोल नाक्यावर पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर वाहनांची राग लागल्यास टोल न आकारता वाहने सोडून वाहतूक कोंडी दूर करणे आवश्यक आहे. परंतु तसे असताना टोल नाक्यावर मात्र टोल वसुलीला प्राधान्य दिले जात असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. सकाळी व सायंकाळी व रात्री तर ह्या रांगा लांब पर्यंत लागलेल्या असतात.
टोल नाक्याच्या जाचामुळे आधीच नागरिक व वाहन चालक त्रासलेले असताना आता महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीच्या कोंडीत प्रचंड भर पडली आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या कमानीखाली मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे. खड्डे खोल असल्याने कसरत करत वाहने या ठिकाणी खूपच धीम्या गतीने पुढे न्यावी लागतात. जेणेकरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. कधी कधी तर ह्या रांगा मीरा रोडच्या प्लेझंट पार्क पर्यंत तर महामार्गावर घोडबंदर पर्यंत लागत असतात.
एक ते दोन तास वाहनांमध्ये लोक अडकून पडतात. या ठिकाणी महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आय. आर. बी., राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मेट्रोचे काम काम करणाऱ्या जे. कुमार व एमएमआरडीए तसेच मीरा भाईंदर महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा चालवला आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून जो तो एकमेकांकडे बोट दाखवत आहे. त्यातच या ठिकाणी असलेली महापालिकेची जलवाहिनी फुटली आहे. त्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाहतूक पोलिसांनी सातत्याने संपर्क साधून जलवाहिनी दुरुस्त करण्यास कळवले आहे. परंतु त्यालासुद्धा आठवडा उलटून गेला आहे.
जलवाहिनी फुटल्याने त्यातून वाहणारे पाणी हे रस्त्यावर व खड्ड्यांमध्ये साचून राहते. जेणेकरून मध्यंतरी सदर खड्डे भरण्याचा प्रयत्न केला असता पाण्यामुळे पुन्हा खड्डे निर्माण झाले. या ठिकाणाहून वाहणाऱ्या नाल्यात अदानी इलेक्ट्रिक सिटी कडून कामादरम्यान प्लायवूडचा तुकडा तसाच ठेवला गेला होता. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. अखेर वाहतूक पोलिसांनी त्याचा पालिके पासून अन्य ना पाठपुरावा केल्यानंतर सदर प्लायवूड चा तुकडा अदानी च्या कर्मचाऱ्यांनी काढल्या नंतर पाण्याचा निचरा होऊ लागला असे सांगण्यात आले. महामार्गावरील खड्डे वाहन कोंडीत भर घालत आहेत.
रमेश भामे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा ) दहिसर चेकनाका कमानी खाली महामार्गावर पडलेले मोठे खड्डे व जलवाहिनी फुटल्याने साचणारे पाणी याबाबत महापालिकेसह संबंधित विभागांशी चर्चा सुरू आहे . पालिकेने जलवाहिनी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. जलवाहिनी दुरुस्त होताच खड्डे भरण्याचे काम केले जाईल असे संबंधित विभागाने कळवले आहे. वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेता सकाळी गर्दीच्या वेळी विरुद्ध दिशेची एक मार्गिका वाहनांसाठी खुली केली आहे.