भिवंडीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण; मनपा विरोधात उद्धव सेनेचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन
By नितीन पंडित | Updated: July 19, 2024 18:06 IST2024-07-19T18:05:45+5:302024-07-19T18:06:09+5:30
शहरात होत असलेल्या सतत पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

भिवंडीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण; मनपा विरोधात उद्धव सेनेचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरात होत असलेल्या सतत पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. भिवंडी महानगरपालिका अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांना सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत उद्धव सेनेने शहरातील कल्याण नाका ते धामणकर नाका रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी ठाकरे गटाच्या वतीने थेट रस्त्यावर उतरून खड्ड्यात ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आले. युवा सेना शहर प्रमुख मोहन पठारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
खड्ड्यामुळे होणारा त्रास तसेच वाहतूक कोंडी यामुळे हैराण झालेली नागरीक याकडे पालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष असल्याने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यात ठिय्या मांडून पालिका प्रशासना विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले . महानगरपालिकेच्या विरोधात असलेली बॅनर पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी कऱण्यात आली.
मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी आमच्या या आंदोलनाची दखल घेऊन शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे लवकरात लवकर भरले नाहीत तर पुढील काही दिवसातच मनपा प्रशासना विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आंदोलनकरते मोहन पठारे यांनी दिली आहे