ठाण्यात रस्त्यांवर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:31 PM2019-07-09T23:31:13+5:302019-07-09T23:31:20+5:30

शहरात ११२२ खड्डे : स्वत:च्याच सर्वेक्षणाने ठाणे महानगरपालिका पडली तोंडघशी

Potholes on the roads in Thane | ठाण्यात रस्त्यांवर खड्डेच खड्डे

ठाण्यात रस्त्यांवर खड्डेच खड्डे

Next

ठाणे : पावसाळ्यापूर्वी ठाणे शहरातील रस्ते चकाचक करण्यात आले होते. त्यामुळे यंदा ठाणेकरांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार नाही, असा दावा पालिकेने केला होता. परंतू पालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएमआरडीएचा हा दावा फोल ठरला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला आहे. आता पाऊस थांबल्याने खड्डे बुजवण्याच्या मोहिमेला सुरुवात होत असून या खड्ड्यांवर तात्पुरत्या स्वरुपात मुलामा लावण्याचे काम सुरु झाले आहे. महापालिकेने ९ प्रभाग समितीनिहाय केलेल्या सर्व्हेत तब्बल ११२२ खड्डे पडल्याची बाब समोर आली आहे. परंतु प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचे पालिकेने मान्य केले आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात ठाणेकरांना खड्ड्यांच्या असह्य त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पालिकेवर टिकेची झोड उठली होती. हे खड्डे बुजविण्याच्या कामात पालिका दिवसरात्र व्यस्त असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलेल्या निर्णयामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच महत्वाच्या रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्तेही चकाचक करण्यात आले होते. केवळ ठाणे महापालिकाच नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए यांनीदेखील त्यांच्या अख्यत्यारीतील रस्ते चकाचक केले होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांना खड्डेविरहित प्रवास मिळेल, असा दावा या यंत्रणांकडून करण्यात आला होता. परंतु हे दावे पावसाने पुरते फोल ठरविले आहेत. तिनहात नाका, नितिन कंपनी, विवियाना मॉल, घोडबंदर सर्व्हीस रोड, मुख्य उड्डाणपुल आदींसह शहरातील इतर भागातही आता खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. हायवेवर खड्डे पडल्याने या ठिकाणच्या वाहतुकीचा वेग आता मंदावला आहे. दरम्यान, पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने आता विविध यंत्रणांकडून खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या रस्त्यांवर केवळ तात्पुरता मुलामा लावण्याचे काम सध्या सुरु आहे. काही ठिकाणी कोल्ड मिक्स, काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक, काही ठिकाणी सिमेंटचे मटेरीअल, तर काही ठिकाणी नुसतीच वाळू टाकून हे खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. परंतु पाऊस परत झाला, तर त्याठिकाणी पुन्हा खड्डे पडणार आहेत.
ठाणे महापालिकेने प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत खड्ड्यांचा सर्व्हे केला आहे. त्या सर्व्हेनुसार शहरात आजच्या घडीला ११२२ खड्डे पडले असून यामध्ये सर्वाधिक खड्डे हे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत आहेत. या ठिकाणी ४३५ खड्डे आहेत. त्या खालोखाल वागळे इस्टेट भागात २५६, दिव्यात ११८ ठिकाणी खड्डे पडले आहेत. दरम्यान, २३३८ चौ.मी. क्षेत्रफळाचे हे खड्डे असून त्यातील ७२३ खड्डे म्हणजेच १६८४ चौ.मी. क्षेत्रफळाचे खड्डे भरण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. खड्डे भरण्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत २५ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आजही ३९९ खड्डे भरण्याचे शिल्लक असून त्याचे क्षेत्रफळ ६५४ चौ.मी. एवढे असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. हे खड्डे भरण्यासाठी कोल्ड मिक्स, जेटपॅचर आदींचा यंत्रणांचा उपयोग केला जात असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे पूर्वेतील टीएमटी स्टॉप परिसर खड्ड्यांनी व्यापला आहे. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी ठाण्यातील सर्व रस्ते पावसाळ्यातही चकाचक राहतील असा दावा महानगरपालिकेने केला होता. ‘लोकमत’ने दि. १८ जून रोजीच्या अंकात प्रसिद्ध केलेला पालिकेचा हा दावा सपशेल खोटा ठरला आहे.

Web Title: Potholes on the roads in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.