उल्हासनगरात रस्त्यात खड्ड्याचे साम्राज्य, खड्ड्यावर दगड, मातीचा उतारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 07:16 PM2021-07-20T19:16:34+5:302021-07-20T19:16:48+5:30
उल्हासनगरातून जाणारा कल्याण ते बदलापूर रस्ता, नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन रस्ता, मोर्यानगरी रस्ता, आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालय बाहेरील रस्ता, जुने बस स्टॉप ते बिर्ला गेट रस्ता, गोलमैदान परिसरातील रस्ते, खेमानी रस्ता, नेताजी चौक ते काली माता मंदिर -कैलास कॉलनी रस्ता आदी बहुतांश रस्ते खड्डेमय झाले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : पावसाळ्या पूर्वी रस्त्यातील खड्डे न बुजविल्याने, रस्ते खड्डेमय होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी पुढाकार घेऊन कल्याण ते बदलापूर, मध्यवर्ती रुग्णालयकडे जाणाऱ्या रस्त्यातील खड्डे दगड, मातीने भरले.
उल्हासनगरातून जाणारा कल्याण ते बदलापूर रस्ता, नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन रस्ता, मोर्यानगरी रस्ता, आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालय बाहेरील रस्ता, जुने बस स्टॉप ते बिर्ला गेट रस्ता, गोलमैदान परिसरातील रस्ते, खेमानी रस्ता, नेताजी चौक ते काली माता मंदिर -कैलास कॉलनी रस्ता आदी बहुतांश रस्ते खड्डेमय झाले. वाहन चालक, नागरिक रस्त्यातील खड्ड्यामुळे हैराण झाले. तर दुसरीकडे महापालिका खड्ड्यावर तात्पुरत्या स्वरूपात दगड-मातीचा उतरा देत आहे. मोटारसायकल खड्डयात पडून अपघात होत असल्याने, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी पुढाकार घेऊन मध्यवर्ती रुग्णालय रस्ता व कल्याण ते बदलापूर रस्त्यातील खड्डे दगड व रेतीने तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले.
महापालिकेने रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी साडे सहा कोटीची निविदा काढली. मात्र प्रत्यक्षात खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली नाही. खड्ड्यात पडून जीवितहानी झाल्यास याला महापालिका जबाबदार राहणार असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. रस्त्याच्या खड्ड्यावरून महापालिका प्रशासनाला धारेवर धरणारे विविध राजकीय पक्षयावर्षी मात्र शांत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आमदार कुमार आयलानी यांच्या संपर्क कार्यालय समोरील रस्त्यावर पाणी साचुन रस्ता खड्डेमय झाल्यावरही खड्ड्याबाबत पालिकेला जाब विचारला नसल्याचा आरोप होत आहे. विरोधी पक्षा प्रमाणे सत्ताधारी असलेली शिवसेना व महापौर लिलाबाई अशान रस्त्यातील दुरावस्थे बाबत एक शब्द काढत नसल्याचे चित्र आहे.
रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच: उपायुक्त नाईकवाडे
महापालिने रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी साडे सहा कोटींची निविदा काढली असून पाऊसाचा जोर कमी होताच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होणार. अशी प्रतिक्रिया उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व शहर अभियंता महेश शितलानी यांनी लवकरच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याची प्रतिक्रिया दिली