खड्डेच खड्डे... ठाणे ते नाशिक आठ तासांचा जीवघेणा प्रवास; कसाऱ्यापर्यंत वाहन चालकांची परीक्षा
By नितीन पंडित | Published: July 28, 2023 10:25 AM2023-07-28T10:25:17+5:302023-07-28T10:25:56+5:30
वाहतूक कोंडीमुळे प्रवासी अक्षरश: मेटाकुटीला
नितीन पंडित,लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : ठाण्याहून नाशिकला जाण्यासाठी फार तर साडेतीन तास लागतात. मात्र, सध्या मुंबई - नाशिक महामार्गावर ठाण्यापासून पुढे प्रचंड खड्डे पडल्यामुळे याच प्रवासासाठी सात ते आठ तास लागतात.
ठाणे ते भिवंडी किंवा कल्याण प्रवासासाठी एरव्ही पाऊणतास लागतो. मात्र, सध्या या प्रवासाकरिता तीन ते साडेतीन तास लागतात. या मार्गावर प्रवास करायचा म्हणजे एक कठोर शिक्षा झाल्याची भावना तासनतास बस, गाडीत अडकून पडलेले प्रवासी व्यक्त करत आहेत. या मार्गावरून वरचेवर प्रवास करणाऱ्यांना पाठदुखीचे आजार जडले आहेत.
भिवंडीत सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. वाहनात बसून अक्षरश: विटलेले काही प्रवासी रस्त्यावर उतरून खड्डे व चिखल तुडवत दोन ते तीन किलोमीटर पायी प्रवास करत आहेत. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका कामगारांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
मुंबई - नाशिक महामार्गावर हायवे दिवे ते पडघापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या घरापाशी कोंडी
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे घर मुंबई - नाशिक महामार्गावर दिवे गावात रस्त्यालगत असल्याने मंत्री पाटील यांच्या घरी ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी येथे वाहने अडविली जातात. त्यामुळे येथे वाहनांचा वेग संथ होतो व येथूनच पुढे पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. भिवंडीतील गोदामात मुंबईवरून भिवंडीत येणारी व भिवंडीतून मुंबईला जाणारी वाहने मानकोली नाक्यावरून वळण घेत असल्याने येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते.
मंत्री, आमदार अडकूनही परिस्थिती ‘जैसे थे’
आमदार सत्यजित तांबे हे या वाहतूक कोंडीत अडकले होते. ट्विट करत त्यांनी या भागातील नागरिकांच्या सहनशीलतेचे कौतुक केले होते. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी अधिवेशनात वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी तर वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे अधिवेशनात राज्य सरकारला धारेवर धरले. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी स्वतः खारेगाव ते वडपा रस्त्याची पाहणी केली.