खड्ड्यांचे ‘विघ्न’ होणार दूर; ठामपा आयुक्तांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 01:01 AM2018-08-22T01:01:19+5:302018-08-22T01:01:55+5:30
गणरायाच्या मार्गातील खड्डे १० सप्टेंबरपर्यंत भरण्याचे आदेश
ठाणे : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाचे आगमन यंदा खड्ड्यातून होईल, अशी भावना ठाणेकरांची झाली असतानाच यंदा विघ्नहर्त्याचे आगमन हे खड्डेमुक्त रस्त्यातून होईल, असा दावा महापालिकेने केला. यासाठी गणरायाचे आगमन व विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे कोणत्याही परिस्थितीत १० सप्टेंबरपर्यंत भरण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी संबंधित विभागाला दिले. दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपाची परवानगी देण्याची प्रक्रिया सोपी करतानाच २४ तासांत मंडप परवानगी देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील विविध रस्त्यांना पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यात येत्या काही दिवसांवर महापौर मॅरेथॉन स्पर्धा येऊन ठेपली आहे. त्यानंतर लागलीच गणरायाचे आगमन होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने शहरातील खड्ड्यांचे प्रमाण वाढले असल्याचे स्पष्ट करून आयुक्तांनी ते भरण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात यावी, असे स्पष्ट आदेश दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या मार्गिका नकाशाची महापालिका आयुक्तांनी पाहणी करून त्यानुसार खड्डे भरण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी देण्याची प्रक्रि या सुलभ करतानाच अर्ज प्राप्त झाल्यानंतर २४ तासांत परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात यावी. मात्र, हे करताना उच्च न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या.
सण साजरा करण्याच्या पद्धतीवर आक्षेप बेडेकरांची भूमिका : भक्तांचा विरोध
ठाणे : मराठी सणांवर निर्बंध आणणे चुकीचे आहे. नागरिकांना त्रास होणार नाही अशाच पद्धतीने आम्ही उत्सव साजरा करतो. वाहतूककोंडी होणार नाही याची स्वयंसेवक काळजी घेतात. कारवाई केल्यास
एकेक कार्यकर्ता रस्त्यावर झोपेल, असा इशारा ठाणे शहरातील गणेशोत्सव मंडळांनी दिला. डॉ. महेश बेडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत घेतलेल्या भूमिकेला गणेशभक्तांनी विरोध दर्शविला असून, माझा सणाला नव्हे तर तो साजरा करण्याच्या पद्धतीवर आक्षेप असल्याचे डॉ. बेडेकर यांनी स्पष्ट केले.
अद्याप कोणत्याही गणेश मंडळाने मंडप उभारणीसाठी परवानगी मागितेली नाही. मुळात, परवानगी देणे हे पोलिसांकडे नाही. पोलीस केवळ मंडपांसाठी एनओसी देतात. सर्व अटी आणि नियमांच्या अधीन राहूनच ही एनओसी दिली जाणार आहे.
- सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाणे शहर
सण, उत्सवांसाठी नियम साधे आहेत. जे रस्ते अपुरे आहेत, ते अडवू नका, कारण ते आपल्या धर्मात नाही. ध्वनिप्रदूषण करू नका. रस्ते अडविणे, खड्डे खणणे, जोरजोरात डीजे वाजविणे हे धर्मात बसत असेल तर बिनधास्त करा. वर्षानुवर्षे सुरू असलेले सण बंद होणार नाही. पण ते साजरे करण्याच्या पद्धतीवर माझा आक्षेप आहे. मंडळं ही आपलीच आहेत, कारवाई कोणालाही आवडत नाही. कोर्टाने सण बंद करा असे सांगितलेले नाही. लोकांना त्रास होईल, अशाप्रकारे सण साजरा करू नका असे सांगितले आहे. - डॉ. महेश बेडेकर
मंडप हे कोर्टाच्या नियमानुसारच बांधले जात आहेत. त्रास मंडपांचा नाही तर आजूबाजूला त्या काळात असलेल्या फेरीवाल्यांचा होत असतो. परंतु, पालिका त्याकडे दुर्लक्ष करते. हा मुद्दा मांडल्यावर पालिकेचे अधिकारी निरुत्तर होते. पालिका अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा मांडला तेव्हा त्या काळात फेरीवाल्यांवर कारवाईचे आश्वासन पालिकेने दिले आहे. डॉ. महेश बेडेकरांनी सर्व धर्मांबद्दल मुद्दा मांडला तर कोर्ट फक्त गणेशोत्सवासाठी कसे आदेश काढते. कोर्टाच्या आदेशानुसार कधी इतर धर्मियांचे सण साजरे होत नाही. डॉ. बेडेकरांना गणेशोत्सवावर आक्षेप असेल तर त्यांना सांगू इच्छितो, हा उत्सव आम्ही टाइमपास म्हणून साजरा करीत नाही. सण, उत्सवाच्या काळात ठाण्यात डीजे वाजतच नाहीत. नियम सर्व धर्मांना सारखे असतील तर इतर धर्म हे नियम का पाळत नाहीत. प्रशासन नियमांच्याबाबत भेदभाव करीत आहे.
- समीर सावंत, अध्यक्ष, ठाणे गणेशोत्सव समिती
गेले ३५ वर्षे आम्ही गणेशोत्सव साजरा करीत आहोत. १२ वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण झाले तेव्हाच आम्ही खड्डे पाडून घेतले होते. इतरवेळी ते आम्ही प्लॅस्टिक पाइप आणि लोखंडी प्लेटने झाकून ठेवतो. मंडप आहे तिथेच राहणार आहे. कारवाई केल्यास उपायुक्तांना काळे फासायची तयारी आम्ही ठेवली आहे.
- हेमंत वाणी, आशीर्वाद मित्र मंडळ, खोपट
गेली ४० वर्षे हा उत्सव साजरा केला जातो. अद्याप मंडप घातलेला नाही. परवानगीसाठी पत्र दिले आहे. परंतु, मंडप घातल्यावर आमच्यावर कारवाई झाल्यास आम्ही त्याला घाबरणार नाही. मंडपाच्या इथे वर्षभर पार्किंग असते. ती संबंधित अधिकाºयांना दिसत नाही का?
- जिवाजी कदम,
चंदनवाडी गणेशसेवा मंडळ, चंदनवाडी
गेल्या ३० वर्षांपासून आम्ही उत्सव साजरा करीत आहोत. आम्ही न्यायालयालाचा अवमान करीत नाही. कळव्याच्या मुख्य बाजारपेठेत आम्ही उत्सव साजरा करतो पण आजवर कोणीही तक्रार केलेली नाही.
- महेश साळवी, नमस्कार मित्र मंडळ, कळवा
कोर्टाच्या आदेशानुसार मंडप उभारला जाईल. मंडपासाठी पालिकेकडून परवानगी घेतली आहे.
- अरविंद सिंग, शिवसेना शाखा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, खेवरासर्कल
मंडप आहे तसेच राहणार, कारवाईला घाबरणार नाही. खड्डे पाडल्याशिवाय मंडप उभा राहील का? - सुशांत सूर्यराव,
न्यू सूर्यानगर मित्र मंडळ, विटावा