निवडणुका येताच झोपड्यांचा पुळका

By admin | Published: April 10, 2017 05:52 AM2017-04-10T05:52:14+5:302017-04-10T05:52:14+5:30

भिवंडी शहर यंत्रमागासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते संवेदनशील म्हणूनही ओळखले जाते. देशात कुठेही जातीय

Potters of the slums of Elections | निवडणुका येताच झोपड्यांचा पुळका

निवडणुका येताच झोपड्यांचा पुळका

Next

रोहिदास पाटील, अनगाव

भिवंडी  शहर यंत्रमागासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते संवेदनशील म्हणूनही ओळखले जाते. देशात कुठेही जातीय दंगल झाली की, त्याचे पडसाद भिवंडीत उमटतात. त्यामुळे नागरिक कायम भीतीच्या छायेखाली राहायचे. आज जरी परिस्थिती सुधारली असली, तरीही अनुचित प्रकार घडेल की काय, असे कायम येथील नागरिकांना वाटत असते. यंत्रमाग कारखान्यांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यांतून गरीब कामगार येथे नोकरीसाठी आले. परिस्थिती अत्यंत हलाखाची असल्याने घर घेणे परवडणारे नव्हते. अशा वेळी त्यांना झोपड्यांचा आसरा मिळाला. एका खोलीत गुरांसारखे कोंबून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. हळूहळू कामगारांची संख्या वाढत गेली, तशी झोपड्या किंबहुना झोपडपट्ट्याही वाढू लागल्या. कालांतराने हा आपला मतदार असल्याने राजकीय नेत्यांनी आपल्या ‘व्होट बँके’साठी यांचा वापर केला. आज बहुतेक चाळी, झोपड्या या नगरसेवकांनी बांधल्या आहेत. वन विभागाच्या जागेवर या झोपड्या सर्रास बांधल्या. 
आज भिवंडी महापालिका नोंदणीकृत झोपड्यांकडून कर आकारणी करते ती ८७ हजार ७४९ रुपयांच्या घरात आहे. मात्र, कर भरूनही येथील नागरिक प्राथमिक सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हे नागरिक आपले जीवन व्यतीत करत आहेत. पालिका निवडणूक साधारण महिनाभरावर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांना आता झोपडीवासीयांचा पुळका यायला सुरुवात होईल. प्रचारात विकासाचे गाजर दाखवले जाईल. निवडणूक संपताच पुन्हा ‘येरे माझ्या मागला’... येथील नागरिकांना सुविधा देण्यापेक्षा नगरसेवकांचा डोळा तेथील मतांवर असतो. एकदा विजयी झालो की, पुन्हा पाच वर्षे तेथे फिरकायचे नाही, असा राजकीय पक्ष, नेत्यांचा शिरस्ता झाला आहे.
या झोपडीत राहणारा हा गरीब कामगार आहे. कचरावेचक, भंगारविक्रेते तसेच आदिम जातीमधील ही मंडळी आहेत. अशिक्षित असल्याने अन्याय झाल्याचे समजत नाही किंवा समजत असले तरी बोलता येत नाही. कारण, आपण असुविधांविरोधात आवाज उठवला, तर डोक्यावरचे छप्पर जाण्याची भीती. त्यामुळे तोंड दाबून बुक्कयांचा मार खाण्यापलीकडे त्यांच्यापुढे दुसरा मार्गच नसतो. त्यांच्या या परिस्थितीचा राजकीय पक्ष फायदा घेतात, तसेच पालिका प्रशासनही त्यात पुढे आहे.
महापालिका क्षेत्रातील शांतीनगर भागात रहेमतपुरा, बिलालनगर, संजयनगर, मुमताजनगर, गायत्रीनगर येथे हजारोंच्या संख्येने येथे झोपड्या उभा राहिल्या आहेत. येथे नागरी सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांचे फार हाल होत आहेत. महापालिकेने बीओटी तत्त्वावर बांधलेल्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. दुर्गंधी, अस्वच्छतेमुळे नागरिक तेथे जातच नाहीत. या स्वच्छतागृहांची देखभाल केली जात नसल्याने आम्हाला नाइलाजास्तव उघड्यावर प्रातर्विधीला जावे लागते, असे येथील नागरिकांनी सांगितले. या सर्वांमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारांची सोय नसल्याने रस्त्यावरून ते वाहत असते. नाकावर रूमाल धरून येथून येजा करावी लागते. पथदिव्यांचे खांब बांधलेले आहेत, मात्र वीजच नाही. यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात चाचपडत जावे लागते, असे या नागरिकांनी आपली व्यथा मांडताना सांगितले.
शांतीनगरमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा, रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून सतावत आहे. येथील झोपड्या या डोंगरावर वसल्या आहेत. तेथील काही जणांकडे पाणी येते. पण, ज्यांच्याकडे पाणी येत नाही, त्यांना डोंगरावरून खाली एक किलोमीटर चालत येऊन पाणी भरावे लागते. यात महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. तसेच रस्त्याचा प्रश्नही भेडसावत आहे. खड्ड्यांतून वाहने चालवावी लागत असल्याने चालकांना अक्षरश: कसरत करावी लागते. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
जागेअभावी येथील नागरिकांनी वन विभागाच्या जमिनीवर अतिक्र मण करून झोपड्या उभारल्या आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शांतीनगर ही सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. येथे दीड लाख लोकसंख्या आहे. मुस्लिमबहुल वस्ती आहे.
वनजमिनीवरील झोपडीधारकांना पडघा वन विभागाने झोपड्या
रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्यामुळे कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. बहुतांश झोपडपट्टी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीजवळ आहे. भविष्यात ही जलवाहिनी फुटली, तर मोठा अनर्थ निर्माण होईल. त्यापूर्वीच पालिका प्रशासनाने या झोपड्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा, जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

अरुंद रस्ते ठरणार अडथळा
झोपडपट्ट्यांमध्ये जाणारे रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्घटना किंवा नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास अग्निशमन दलाचे बंब, रुग्णवाहिकाही जाऊ शकणार नाही. पण, याकडे लोकप्रतिनिधींबरोबरच पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात अनर्थ झाला, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. १३ लाखांच्या लोकसंख्येसाठी केवळ चार अग्निशमन केंदे्र आहेत. पण, ती अपुरी असल्याने त्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.

पालिका
शाळांचीही बोंब
शहरात पालिकेच्या ११२ शाळा आहेत. या पालिका शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. विद्यार्थ्यांना घरून पाणी आणावे लागते. विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली आहे. शांतीनगर, रेहमतपुरा, साठेनगर, गायत्रीनगर, आझमीनगर येथील पालिका शाळांमध्ये सुविधांचा अभाव आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर
शहरात १५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. कामतघर, वऱ्हाळादेवी, अण्णा भाऊ साठेनगर, शांतीनगर, रेहमतपुरा या झोपडपट्टीच्या ठिकाणी आरोग्य केंद्रे आहेत. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात. वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी राहतसुद्धा नाहीत.
परिणामी, रात्रीअपरात्री
रुग्णाला आणले तर योग्य सुविधाही मिळत नाहीत. याविषयी अनेक वेळा तक्र ारी करूनही आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिकांसह कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र जनरल युनियनचे अध्यक्ष महेंद्र कुंभारे यांनी दिली.

Web Title: Potters of the slums of Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.