जावेने जावेवर उकळता चहा ओतला
By admin | Published: May 23, 2017 01:53 AM2017-05-23T01:53:13+5:302017-05-23T01:53:13+5:30
मासे सुकवण्याच्या जागेवरून झालेल्या भांडणात धाकट्या जावेने मोठ्या जावेच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकल्याची घटना उत्तन परिसरात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मासे सुकवण्याच्या जागेवरून झालेल्या भांडणात धाकट्या जावेने मोठ्या जावेच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकल्याची घटना उत्तन परिसरात घडली. धाकट्या जावेविरोधात गुन्हा दाखल झाला असून अद्याप अटक झालेली नाही.
उत्तनच्या नवीखाडी येथे रेनी मलेकर व सिडनी मलेकर हे मच्छीमार भाऊ एकाच घरात राहतात. कौटुंबिक भांडणामुळे दोन चुली आहेत. १९ मे रोजी सायंकाळी रेनीची पत्नी लिडवीना (४६) ही मुलगी लिंसीया (२२) सोबत मासे सुकवण्यासाठी गेल्या होत्या. लिडवीना ह्या रेनीच्या काकांच्या जागेत मासे सुकवत असताना सिडनीची पत्नी लिया आली व मला मासे सुकवायचे आहेत सांगून हुज्जत घालू लागली. लिंसीयाने आईला घरी जाण्यास सांगितले असता लिडवीना घरी आल्या. पाठोपाठ लिया सुध्दा आली.
दोघींनी त्यांच्या वेगवेगळ्या गॅस शेगडीवर चहा ठेवला. दरम्यान लियाने आमच्या जागेवर मासे का सुकवायला टाकले म्हणून लिडवीना हिला शिविगाळ व धक्काबुक्की केली. त्याच रागात लियाने गॅसवर उकळत असलेला चहा लिडवीनाच्या चेहऱ्यावर ओतला. उकळता चहा तोंडावर पडल्याने लिडविना जखमी झाली असता तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले.
उत्तन पोलिसांनी लिया विरोधात गुन्हा दाखल केला असून सहायक निरीक्षक सरोजना मोकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक डी.आर.चेल्ले तपास करत आहेत. अशाप्रकारे क्रूरपणे वागणाऱ्या लिया हीला अद्याप अटक केली नसल्याने लिडवीना व कुटुंबियांनी त्वरीत अटक करण्याची मागणी केली आहे.