कुडूस ग्रा.पं.वर कॉग्रेसची सत्ता
By admin | Published: April 20, 2016 01:49 AM2016-04-20T01:49:30+5:302016-04-20T01:49:30+5:30
तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या कुडूस ग्रामपंचायतीवर कॉग्रेसने १५ पैकी १२ जागांवर विजय संपादन करून एक हाती सत्ता मिळवली आहे.
वसंत भोईर, वाडा
तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या कुडूस ग्रामपंचायतीवर कॉग्रेसने १५ पैकी १२ जागांवर विजय संपादन करून एक हाती सत्ता मिळवली आहे. कॉग्रेसचे नेते इरफान सुसे हे 'किंगमेकर' ठरले आहेत. शिवसेनेकडे असलेली सत्ता कॉग्रेसने हिसकावून घेतली आहे.
वॉर्ड क्रमांक १ मधून अंजुमन सुसे, दामोदर डोंगरे, छबी तुंबडे, वॉर्ड क्रमांक ३ डॉ. गिरीश चौधरी, मधुकर लाथड, चेतना उराडे वॉर्ड क्रमांक ४ महरून शेख, सलमा मेमन, कुमार जाबर, वॉर्ड क्रमांक ५ सचिन जाधव, कैलास चौधरी, भारती सांबरे हे कॉग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपाचे नेते भगवान चौधरी यांना स्वत: सह फक्त तीन जागांवर विजय संपादन करता आला. शिवसेनेचे मिलींद चौधरी यांनी १५ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना खातेही खोलता आले नाही.
महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नारे ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वषार्पासून भाजपाचे नेते कुंदन पाटील यांची सत्ता होती. ही सत्ता शिवसेनेचे युवा नेते सुधीर पाटील यांच्या एकता परिवर्तन पॅनलने उलथवून टाकली आहे. ९ पैकी ९ जागांवर विजय मिळवून सुधीर पाटील स्वत: विजयी झाले आहेत. या ग्रामपंचायतीकडे उभ्या तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर एवढ्या वर्षांची सत्ता उलथविल्याने पाटील हिरो ठरले आहेत.
शिवसेनेचे नेते सुनिल पाटील यांच्या डाकिवली विकास आघाडी ने ७ पैकी ४ जागांवर विजय मिळविला आहे. रिद्धी पाटील, अश्विनी जाधव, स्वप्नील जाधव, मीनल चव्हाण हे उमेदवार निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांचे अभिनंदन होत आहे.