साहित्यामध्ये युवाशक्तीला दिशा देण्याची ताकद- एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:54 PM2018-12-10T23:54:10+5:302018-12-10T23:54:38+5:30
राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनाचा समारोप, पुढील संमेलन दिल्लीला ?
अंबरनाथ : अंबरनाथ शहराला शिवमंदिरामुळे ऐतिहासिक तर कारखानदारीमुळे औद्योगिक वारसा मिळालेला आहे. या सोबतच आता शहराला साहित्यिक वारसा देखील लाभला आहे. साहित्यामध्ये युवाशक्तीला दिशा देण्याची ताकद आहे. त्यामुळे साहित्याचा वारसा आता युवकांच्या माध्यमातून जपण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
८ आणि ९ डिसेंबर या दोन दिवसांत राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनाचे अंबरनाथ शहरात आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस रंगलेल्या या महोत्सवाची सांगता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी शिंदे यांनी युवाशक्तीकडे साहित्याची धुरा देण्याची गरज व्यक्त केले. तरुण साहित्यिक घडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्यात तरुणांना संघटीत करुन युवाशक्ती साहित्य संमेलन भरवल्यास तरुणांमधील साहित्यिकांना संधी मिळेल. अनेक तरुण साहित्याकडे ओढले जातील. तरुणांमध्ये लिखाणाचे कौशल्य आहे. त्याला वाव देण्यासाठी अशा साहित्य संमेलनांची गरज आहे.
अंबरनाथला साहित्याची गोडी आहे. त्यामुळेच येथे होणाऱ्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तीन वर्षांपासून सुरू झालेला हा फेस्टिव्हल राष्ट्रीय स्तरावरील झाला आहे. त्यामुळे कला आणि साहित्य क्षेत्रात अंबरनाथचे नाव उंचावल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हणतात ते काही खोटे नाही. पुढील संमेलन दिल्लीला घेण्याची मागणी होत आहे. त्यासाठी जी काही मदत लागेल, ती मी नक्की करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील चौधरी यांनीही अंबरनाथमध्ये पुस्तकांचे शहर ही संकल्पना राबवली जात असल्याची माहिती दिली. लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार असून देशातील पहिले साहित्य उद्यान अंबरनाथमध्ये साकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोमसापने संमेलनासाठी अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेतली नाही. त्याची प्रेरणा मराठी साहित्य परिषदेनेही घेतली. त्यामुळे कोमसाप खूप आधीपासून पुरोगामी विचारसरणीचे असल्याचे कवी अरूण म्हात्रे यांनी समारोपाच्या वेळी सांगितले. दोन दिवस रंगलेल्या संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, मुलाखत, अनवट गप्पा, वाद्यसंगीत व भावगीत, मुक्त चर्चा, एकपात्री अभिनय असे कार्यक्रम आयोजित केले होते.
या संमेलनाच्या निमित्ताने कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, प्रसिध्द लेखक अरविंद जगताप, कवी डॉ. महेश केळुसकर, अरुण म्हात्रे, किरण येले असे दिग्गज साहित्यिक अंबरनाथमध्ये आले. त्यांच्या साहित्यांचा आस्वाद रसिकांनी घेतला.