तब्बल १६ तास वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 12:23 AM2020-08-16T00:23:28+5:302020-08-16T00:23:31+5:30
काही घरांमध्ये तब्बल १६ तासांनी वीजपुरवठा सुरळीत झाला. स्वातंत्र्यदिनी अशी घटना घडल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे.
डोंबिवली : गोग्रासवाडी भागातील साकार रेसिडेन्सी येथे महावितरणच्या वीजवाहिनीत बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. त्यामुळे तेथील साडेसात हजार ग्राहकांना त्याचा फटका बसला. काही घरांमध्ये तब्बल १६ तासांनी वीजपुरवठा सुरळीत झाला. स्वातंत्र्यदिनी अशी घटना घडल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे.
महावितरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक ट्रान्सफॉर्मर, मुख्य उच्चदाबवाहिनी आणि अन्य एका यंत्रणेत एकाचवेळी बिघाड झाला. शुक्र वारी रात्री पाऊस पडत असल्याने कामात अडथळा येत होता. शनिवारी सकाळी महावीरनगर येथील एका फिडरवरून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तरीही, एकनाथ म्हात्रेनगर भागातील पुरवठा दुपारपर्यंत सुरळीत झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. साकार सोसायटीच्या भागातील ट्रान्सफॉर्मर फेल झाला असून तो दाब घेत नसल्याने समस्या वाढली आहे.
>‘विजेच्या त्रासातून सोडवा’
आमच्या घरात आई आजारी असून त्यात १६ तास वीज खंडित झाली होती. बिले वारेमाप येतच आहेत. पण, अखंडित वीजपुरवठा मात्र महावितरण देऊ शकत नाही. याकडे सत्ताधारी, विरोधी पक्ष नेत्यांनी लक्ष घालून सोक्षमोक्ष लावावा व या त्रासातून सोडवावे, अशी प्रतिक्रिया अभिलाष पगारे या तरुणाने दिली.