पूरस्थितीमुळे १८ हजार ग्राहकांची वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:34+5:302021-07-23T04:24:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : संततधार पावसामुळे पाणी साचल्याने कल्याण मंडळ १ कार्यालयांतर्गत जवळपास १७ हजार ८००हून अधिक ग्राहकांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : संततधार पावसामुळे पाणी साचल्याने कल्याण मंडळ १ कार्यालयांतर्गत जवळपास १७ हजार ८००हून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो सर्कल, शहाड, योगीधाम, घोलप नगर भागात पाणी साचल्याने बारावे येथून निघणारा मुरबाड रोड फिडर व या परिसरातील ८० रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बंद करण्यात आले. तेजश्री येथून निघणारा पौर्णिमा फिडरवरील पौर्णिमा सर्कल भागातील नऊ रोहित्र बंद ठेवण्यात आले. मोहने फिडरवरील २० रोहित्र बंद ठेवण्यात आले.
कल्याण मंडळ कार्यालय २ अंतर्गत सरळगाव फिडरवरील ४० रोहित्र बंद ठेवण्यात आली असून, परिसरातील १९ गावे आणि ५,३०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. शहापूर फिडरवरील २० रोहित्र बंद ठेवली असून, ११ गावे व १८०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. किन्हवली फिडरवरील ६७ रोहित्र बंद ठेवण्यात आली असून, ३४ गावे व ४५०० ग्राहक बाधित झाले आहेत. कोन, पिंपळघर, म्हारळ, गोवेली, कांबा परिसरातील ६०० रोहित्र बंद असून ४० गावे व ९० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. बदलापूर पूर्व आणि पश्चिम, बाजारपेठ वांगणी येथील १३० रोहित्र बंद असून ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. उल्हासनगर-३, शांतीनगर, करोतिया नगर, स्मशानभूमी, भालेराव व रोकडे नगर भागातील १८ रोहित्र बंद असून ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे.
टप्प्याटप्प्याने सुरू करणार
पुराच्या पाण्याच्या पातळी कमी होईपर्यंत बाधित क्षेत्राचा वीजपुरवठा बंद ठेवला जाईल. त्यानंतर पाणी ओसरताच टप्प्याटप्प्याने पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
--------