कल्याण- डोंबिवलीत २ लाख ६७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:42 AM2021-05-18T04:42:18+5:302021-05-18T04:42:18+5:30
डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात वीज वितरण यंत्रणेला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने तसेच विजेचे खांब ...
डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात वीज वितरण यंत्रणेला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने तसेच विजेचे खांब वाकणे, खांब पडणे, वीज वाहिन्या तुटल्यामुळे डोंबिवली विभाग कार्यालयांतर्गत १ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच कल्याणमध्ये पश्चिमेला ३८ हजार, पूर्वेला ७५ हजार अशा सुमारे २ लाख ६७ हजार ग्राहकांची वीज खंडित झाली होती. या सर्व समस्यांमध्ये कुठेही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली.
त्यापैकी डोंबिवलीतील ८० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास अन्य भागातील वीजपुरवठा पूर्ववत झाला. चक्रीवादळाचा सामना करून महावितरणचे कर्मचारी नादुरुस्त यंत्रणेची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मध्यरात्रीपासून काम करत होते. वरिष्ठ अधिकारी स्वतः फिल्डवर उतरून दुरुस्तीच्या कामांना गती देत असल्याचे सांगण्यात आले.
कल्याण पूर्व विभाग कार्यालयांतर्गत ७५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत तो सुरळीत करण्यात आला आहे. काही ठिकाणी खंडित वीजपुरवठ्याचा कालावधी १५ मिनिटांपासून एक ते सव्वातासांचा तसेच डोंबिवलीत तो कालावधीत पाच तासांहून अधिक होता. कल्याण पश्चिम विभाग कार्यालयांतर्गत ३८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. या सर्व ग्राहकांचा पुरवठा पूर्ववत केला असल्याचे महावितरणने सांगितले.
सकाळपासून वादळ वार्याचा जोर खूप असल्याने समस्या निर्माण झाली होती. दुपारी काही प्रमाणात वादळ कमी झाले होते. परंतु, पावसाचा जोर वाढला होता, त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात अडथळे आले होते.
---------
सोमवारी सकाळी एमआयडीसी भागातील १०० केव्हीच्या मुख्य वीज वाहिनीत समस्या आल्याने तेथून पूर्ण शहराला होणारा वीज पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे एकीकडे झाड तुटून पडणे तर दुसरीकडे तांत्रिक बिघाड अशा आव्हानांमुळे महावितरण कर्मचाऱ्यांची सेवा पुरवताना दमछाक झाली होती.
----------