पाचशे रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या वीजपुरवठा होणार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:43 AM2021-09-27T04:43:40+5:302021-09-27T04:43:40+5:30
शहापूर : विद्युत वितरण कंपनीसाठी वीज बिलाची वाढती थकबाकी मोठी डोकेदुखी ठरली आहे. शहापूर उपविभागात १३ हजार ९४ ग्राहक ...
शहापूर : विद्युत वितरण कंपनीसाठी वीज बिलाची वाढती थकबाकी मोठी डोकेदुखी ठरली आहे. शहापूर उपविभागात १३ हजार ९४ ग्राहक विद्युत वितरण कंपनीच्या रडारवर असून, त्यांच्याकडून ४ कोटी ६ लाख रुपयांची थकबाकी येणे आहे. शहापूर उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी कंबर कसली असून, ५०० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांवर वसुलीसाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. थेट विद्युत पुरवठा खंडित करण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे.
विद्युत वितरण कंपनीच्या शहापूर, शहापूर (ग्रामीण), शेणवा, किन्हवली, डोळखांब, कसारा, खर्डी आदी विभागीय कार्यालयांकडून ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करून त्यांचे मीटर काढून घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यासाठी ६७ लाइनमन व कंत्राटी कर्मचारी या मोहिमेंतर्गत कामाला लागले आहेत. एका कर्मचाऱ्याला दररोज एकूण २५ मीटर काढून आणण्याचे लक्ष्य दिले आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण ४ हजार ३९६ जणांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून, त्याची एकूण थकबाकी २ कोटी ९६ लाख इतकी आहे. अजून ६ हजार ७९३ जणांचा विद्युत पुरवठा खंडित करणे बाकी असून, त्यांची एकूण थकबाकी २ कोटी ८ लाख इतकी आहे. वसुलीसाठी ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ६ हजार ९२३ ग्राहकांकडून १ कोटी ७६ लाख रुपयांची थकबाकी वसुली झाली असल्याचे शहापूर उप विभागीय कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी सांगितले. पूर्वी एक हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात होता. आता मात्र ५०० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी झालेल्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित होत आहे. अशा पद्धतीने वसुलीची कठोर कारवाई सुरू असल्याने विद्युत ग्राहक अधिकच मेटाकुटीस आला आहे. उप कार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी विद्युत बिले वेळेत भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.