उल्हासनगरच्या तीन जीन्स कारखान्यांकडून साडेसात लाखांची वीजचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:51 AM2021-09-16T04:51:22+5:302021-09-16T04:51:22+5:30
गुन्हे दाखल लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : उल्हासनगर उपविभाग पाच अंतर्गत तीन जीन्स कारखान्यांनी वीज मीटरमध्ये फेरफार करून ...
गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : उल्हासनगर उपविभाग पाच अंतर्गत तीन जीन्स कारखान्यांनी वीज मीटरमध्ये फेरफार करून साडेसात लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने महावितरणने या कारखान्यांविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात वीजचोरीचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. वीज चोरीसाठी मीटरच्या मागच्या बाजूला भोक पाडून वीज वापर मोजण्याची वायर तोडण्याची क्लुप्ती या कारखान्यांनी वापरली होती. परंतु, संबंधित कारखान्यांच्या वीज वापर माहितीच्या विश्लेषणातून (डाटा ॲनालिसीस)द्वारे ही चोरी उघडकीस आली.
जागामालक अर्जुन रामपाल चौरसिया आणि वीज वापरकर्ता लवकुशकुमार धर्मराज कुशवाह यांच्या कारखान्यात मीटरशी छेडछाड करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळले. मीटरची गती कमी करून कारखान्याने एक लाख ३४ हजार २८० रुपयांची वीज चोरून वापरल्याचे आढळले. दुसरे ग्राहक रमेश मोतीराम लालवाणी व त्यांचे प्रतिनिधी हरेश कृष्णानी तसेच वीज वापरकर्ते विजय भिक्कुवाढेल यांनी ओटी सेक्शन येथील त्यांच्या कारखान्याच्या मीटरमध्ये फेरफार करून ५ लाख ८३ हजार ३२० रुपयांची वीज चोरुन वापरल्याचे निष्पन्न झाले. तिसऱ्या प्रकरणात अयुब नवाब खान याने त्याच्या गायकवाड पाडा येथील कारखान्याच्या मीटरची छेडछाड करून ३१ हजार ३५० रुपयांच्या विजेची चोरी केल्याचे आढळले. सहाय्यक अभियंता रोहिदास बरंडवाल यांच्या फिर्यादीवरुन सर्व संबंधितांवर वीज कायद्याखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
-------------/---/
वाचली