ठाणे-पालघरमधील सहकार महर्षींना धक्का
By Admin | Published: December 23, 2015 12:33 AM2015-12-23T00:33:33+5:302015-12-23T00:33:33+5:30
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत विविध स्वरूपांच्या सुमारे ३२ हजार सहकारी संस्थांची कागदोपत्री नोंद आहे.
सुरेश लोखंडे, ठाणे
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत विविध स्वरूपांच्या सुमारे ३२ हजार सहकारी संस्थांची कागदोपत्री नोंद आहे. परंतु, जिल्हा उपनिबंधक विभागाच्या सर्वेक्षणात सुमारे चार हजार १३२ संस्था बेपत्ता असल्याच्या आढळल्या आहेत. चार हजारांपेक्षा जास्त संस्था असलेली सहकार क्षेत्रातील ही व्होट बँक बुडीत निघाल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील तथाकथित सहकार महर्षींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
जिल्हा उपनिबंधक विभागाने जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे १८ प्रकारच्या सहकारी संस्थांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन हे सर्वेक्षण केले. परंतु, ३२ हजार सहकारी संस्थांपैकी चार हजार १३२ संस्थांचे ठिकठिकाणच्या पत्त्यांवरील कार्य बंद असल्याचे आढळले. यामध्ये सर्वाधिक सुमारे तीन हजार गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. या संस्थांनी अस्तित्वात असल्याचा दावा जरी केला असला तरी तपासणी अहवालात आणि दर वर्षाचा वार्षिक आॅडिट अहवाल देण्यासाठी या बेपत्ता संस्थाचा कस लागणार आहे.
जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, कृषी बाजार समिती, एमपीएमसी मार्केट, यासारख्या अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुकांना संस्थांच्या अध्यक्षांना मतदानाचा हक्क असतो. प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार ठिकठिकाणांहून बेपत्ता संस्थाऐनवेळी ठराव घेऊन अध्यक्षांना मतदानाची संधी देतात की काय, असा गंभीर संशय जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. जर तसे होत असेल तर या बुडीत व्होट बँकेमुळे सहकार महर्षींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कागदोपत्री नोंद असलेल्या या संस्थांचा शोध संबंधित पत्त्यांवर घेतल्यानंतरही त्या आढळल्या नाहीत. नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांच्या पत्त्यांवर अन्य संस्थांच्या इमारती मोठ्या प्रमाणावर आढळल्या. त्यात मूळ संस्था निश्चित करता येत नाही. संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील अस्तित्वाच्या दृष्टीने संपर्क साधला नाही. या तीन हजार गृहनिर्माण संस्थांसह पतसंस्था, शेतीसंस्था, आदिवासी, भात गिरणी, ग्राहक, औद्योगिक, मजूर, मच्छीमार, दुग्ध, जंगल कामगार, पगारदार आदी सुमारे १८ स्वरूपांतील एक हजार संस्थांचा सहभाग आहे.