तळीरामांची ठाणे पोलिसांनी केली कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:30 AM2017-07-24T06:30:26+5:302017-07-24T06:30:26+5:30
गटारी अमावस्या मद्य आणि नॉनव्हेजवर ताव मारत साग्रसंगीत निसर्गरम्य ठिकाणी पार्टीचा बेत आखणाऱ्या तरुणाईचे गट येऊरच्या जंगलात
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गटारी अमावस्या मद्य आणि नॉनव्हेजवर ताव मारत साग्रसंगीत निसर्गरम्य ठिकाणी पार्टीचा बेत आखणाऱ्या तरुणाईचे गट येऊरच्या जंगलात रविवारी सकाळपासूनच येत होते. परंतु, वर्तकनगर पोलीस, वन विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कडेकोट नाकाबंदीमुळे तळीरामांना आपल्या पार्टीचे ‘दुकान’ अन्यत्र हलवावे लागले. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या १५, तर मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या एकाविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डोंबिवलीतही शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने ११ मद्यपींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आषाढ महिन्याचा अखेरचा दिवस म्हणजे गटारी अमावस्या. या दिवशी जल्लोषात पार्टीच्या नावाखाली धांगडधिंगा करण्याचे प्रकार हे येऊर, उपवन परिसरात गेल्या काही वर्षांत वाढीस लागले आहेत. यातूनच या भागात फिरण्यासाठी येणाऱ्या मुलामुलींना छेडण्याचे, हाणामारीचे आणि अगदी लुटमारीचेही प्रकार होतात. या सर्वांना पायबंद घालण्यासाठी येऊर या संरक्षित शांतता वनक्षेत्रात महिला तसेच पर्यटनासाठी येणाऱ्यांना त्रास आणि मद्यप्राशन करून धिंगाणा घालणारे, छेडछाड करणाऱ्यांवर कायद्याचा वचक राहण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या वेगवेगळ्या पथकांनी रविवारी दिवसभर गस्त आणि नाकाबंदी केली होती. यात मद्यप्राशन करून आरडाओरडा करणाऱ्या एकाविरुद्ध तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या १४ जणांविरुद्ध मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. या १४ चालकांची श्वास विश्लेषक यंत्रणेद्वारे तपासणी केली. त्यात त्यांनी प्रमाणापेक्षा अधिक अल्कोहोल घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस, वनविभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कोंडीमुळे गटारीबहाद्दरांची मात्र चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे अनेकांनी अन्यत्र आपला मोर्चा वळवला. काहींना पार्टीविना घरी परतावे लागले.
यानिमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून गटारीच्या निमित्ताने येऊरमध्ये होणारा धुडगूस थांबल्याची प्रतिक्रिया येथील स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली. या भागामध्ये निसर्ग आणि पर्यावरणासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या येऊर एन्व्हायर्नमेंट सोसायटी संस्थेच्या तीन वर्षांच्या ग्रीन गटारी उपक्रमाचेही यातून सार्थक झाल्याचे बोलले जात आहे. या उपक्रमामुळेच या भागातील ९० टक्क्यांहून अधिक पार्ट्या बंद झाल्याचा दावा उपक्रमाचे समन्वयक रोहित जोशी यांनी व्यक्त केला.
कडक तपासणीमुळे येऊर यंदा शांत
गटारीच्या पूर्वसंध्येपासूनच पोलिसांनी येऊरच्या प्रवेशद्वारावर कडक तपासणी केल्यामुळे यंदा येऊरचा परिसर मद्यपींच्या उपद्रवापासून मुक्त झाल्याचे पाहायला मिळाले. येथील काही बंगल्यांमध्ये आणि रिसॉर्टमध्ये गेलेल्यांच्या पार्ट्या सुरू होत्या.