प्रकल्पग्रस्तांची जोरदार धडक
By admin | Published: March 22, 2016 02:10 AM2016-03-22T02:10:30+5:302016-03-22T02:10:30+5:30
गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाही या प्रकल्पात बाधित झालेल्या रहिवाशांचे कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुनर्वसन केलेले नाही.
कल्याण : गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाही या प्रकल्पात बाधित झालेल्या रहिवाशांचे कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुनर्वसन केलेले नाही. बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या घरकुलांमध्ये तातडीने त्यांचे पुनर्वसन करा, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी महापालिका मुख्यालयावर सोमवारी
धडक मोर्चा काढला.
पश्चिमेकडील दुर्गाडी चौक ते शिवाजी चौक ादरम्यान होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून महापालिका प्रशासनाने २००५ मध्ये गोविंदवाडी बायपास मार्गाचे काम हाती घेतले. त्या वेळी प्रकल्पात बाधित होणाऱ्या रहिवाशांना बीएसयूपी योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरकुलांमध्ये पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु, त्या आश्वासनाला ११ वर्षे उलटूनही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेच नाही, याकडे मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले. प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाच्या अनुषंगाने सांगितल्या जात असलेल्या अटी जाचक असल्याचा आरोप त्यांनी केला. २६ जुलै २००५ ला प्रलंयकारी महापुरात मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे नष्ट झाली. त्यामुळे पुरावा सादर करू शकत नसल्याने बहुतांश प्रकल्पग्रस्तांना हक्काच्या घराला मुकावे लागत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मोर्चा महापालिका मुख्यालयावर धडकताच शिष्टमंडळाने बीएसयूपी पुनर्वसन समितीचे सहायक आयुक्त प्रकाश ढोले यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. गोविंदवाडी प्रकल्पग्रस्तांची यादी ७५० जणांची असताना हजारोंच्या आसपास लाभार्थी पावत्या कशा दिल्या गेल्या, असा सवालही या वेळी करण्यात आला. (प्रतिनिधी)