मनसेच्या तक्रारीनंतर दखल, अर्ध्या किंमतीत उपलब्ध होणार PPE कीट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 06:59 PM2020-07-15T18:59:10+5:302020-07-15T19:00:15+5:30
- रूग्णांच्या नातेवाईकांना दिलासा
ठाणे : आधीच कोरोना महामारीने पिचलेल्या गोरगरीब रुग्णांना पीपीई कीट तिप्पट दराने विकून ठाण्यात खासगी रुग्णालयांकडून लूट सुरु होती. या पीपीई कीट घोटाळ्यात मेडीकल चालकही उतरले असून खासगी रुग्णालयांच्या साथीने त्यांनी रुग्णांच्या खिशाला काञी लावण्याचा गोरखधंदा थाटला होता. याप्रकरणी पालिका प्रशासन व एफडीएकडे मनसेने केलेल्या लेखी तक्रारीनंतर या लुटीला चाप बसला असून एफडीएने दिलेल्या निर्देशानुसार अर्ध्या किंमतीत पीपीई किट उपलब्ध होणार असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनसेच्या पाठपुराव्यामुळेच मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाण्यातील अंबिकानगर परिसरात असणार्या स्वस्तिक हाॅस्पिटलमध्ये ११ ते १७ जूनदरम्यान कोरोना रुग्णावर उपचार करण्यात आले. या रुग्णाच्या एकूण बिलापैकी तब्बल ४९ हजार ३५० रुपये पीपीई किटबाबत लावण्यात आले. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी पाचंगे यांनी अधिक माहिती घेतली असता पीपीई किटचा दर २३५० रूपये इतका आकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणी हाॅस्पिटल व संबधित मेडिकलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिका उपायुक्त केळकर आणि अन्न व औषध विभाग परिमंडळ एकच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांची भेट घेत निवेदनाद्वारे पाचंगे यांनी केली होती. त्यानुसार एफडीएने मेडीकलची तपासणी केली असून सध्या सबंधित मेडिकल २ हजार रुपये दराचे पीपीई किट १२०० रुपये दराने विकत असल्याचे पाचंगे यांना एफडीएने दिलेल्या पञात नमूद केले आहे.
सर्वच मेडीकलची तपासणी करावी
केवळ तक्रारीनंतर एकाच मेडीकलची तपासणी करुन एफडीएने न थांबता शहरातील विविध मेडीकलची तपासणी केल्यास सत्यता समोर येईल. मनसे याबाबत पाठपुरावा करत असून खासगी रुग्णालय व मेडिकलच्या लुटीचे बळी पडलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मनसेकडे संपर्क साधावा, याबाबत प्रशासनाकडे योग्य पध्दतीने पाठपुरावा करुन h न्याय मिळवून दिला जाईल.
- संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,
विभाग अध्यक्ष (ओवळा माजीवडा)