प्रभू श्रीराम कोणाची खासगी मालमत्ता नाही, धर्माची रक्षा करणारी शिवसेना आहे: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 06:01 AM2023-12-26T06:01:52+5:302023-12-26T06:02:04+5:30
‘जय श्रीराम, जय बजरंगबली’ म्हटले की सर्व हिंदू त्यांच्याबरोबर जातील, असे त्यांना वाटते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड ( Marathi News ): आम्हाला मत द्याल, तर श्रीरामाचे मोफत दर्शन घडवू, असे मध्य प्रदेशच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. मग काय महाराष्ट्रातल्या हिंदूंना श्रीरामाचे मोफत दर्शन मिळणार नाही का? श्रीरामाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना कोणाला मत दिले हे विचारून दर्शन देणार का? प्रभू श्रीराम हे तुमची खासगी मालमत्ता नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मीरा भाईंदर यादव समाज सेवा संस्था चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रामदेव पार्क भागात गोवर्धन पूजा कार्यक्रमात रविवारी रात्री ठाकरे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. या प्रसंगी खा. राजन विचारे, शंकर वीरकर, यादव संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष रंगबहादूर यादव, अध्यक्ष उमेश यादव, सचिव आर. बी. यादव आदी उपस्थित होते.
श्रीरामाचे मंदिर होतेय ही गर्वाची गोष्ट आहे. ‘जय श्रीराम’ हे हजारो वर्षांपासून म्हटले जाते. तुम्ही तर आता आलात. ‘जय श्रीराम, जय बजरंगबली’ म्हटले की सर्व हिंदू त्यांच्याबरोबर जातील, असे त्यांना वाटते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
धर्माची रक्षा करणारी शिवसेना
राम आणि हाताला काम देणारे आहे. नैसर्गिक आपत्ती, दंगे, अपघात कोणतीही आपत्ती आली तेव्हा शिवसैनिक जिवाची परवा न करता पुढे असतो व तेच आमचे हिंदुत्व आहे. हाच फरक आहे त्यांच्या आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात. ९२ च्या दंगलीत शिवसेनेने हिंदूंना वाचविले. त्यावेळी भाजप कुठे होती? मुंबई जळत होती तेव्हा बाळासाहेब आणि शिवसेना होती. अधर्माच्या विरुद्ध धर्माची रक्षा करणारी शिवसेना आहे. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, असेही ते म्हणाले. मुंबईत सर्व जण पोटापाण्यासाठी आले. पण, आता काम कुठे करणार? उद्योग-धंदे गुजरातमध्ये नेत आहेत. मग, सर्व उठून गुजरातमध्ये जाणार का, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.