ठाण्यातील अभिनय कट्टयाची संध्याकाळ रंगली डूबाईटी या एकांकिकेच्या प्रयोगाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 04:51 PM2017-12-18T16:51:30+5:302017-12-18T16:54:27+5:30
विविध कलाकृती सादर करणाºया अभिनय कट्ट्यावर या रविवारी एक वेगळा प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
ठाणे: ३५५ क्र मांकाच्या अभिनय कट्ट्याची संध्याकाळ ही ‘डूबाईटी’ या एकांकिकेच्या प्रयोगाने रंगली. यावेळी विविध कलाकारांनी सादर केलेले सलग २० एकपात्री प्रयोग सुद्धा लक्षावधी ठरले.
प्रेक्षक प्रतिनिधी श्रीपाद नेमाडे आणि स्वाती नेमाडे यांच्या हस्ते दीप्रज्वलन पार पडले. निवेदिका आरती ताथवडकर यांनी सूत्रसंचालनाची सूत्रे हाती घेत कट्ट्याच्या कार्यक्र मास आरंभ केला. सई कदम, सचिन हिमुकले, रोहित मुणगेकर, लवेश दळवी, यांनी अनुक्र मे आमच्या ‘स्वयंपाकीन काकू’, ‘मी वासुसेव’, ‘अश्विन जागा होतो तेंव्हा’, ‘गुरु पौर्णिमा’ या एकपात्री सादर केल्या तर रुचिता आठवले हिने ‘किती सुंदर आहे हे जग’, प्रतिभा घाडगे यांनी ‘खरच मोबाईलची गरज आहे का?’, रोशनी उंबरसाडे हिने ‘मी.. मी आहे’ या एकपात्रीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. साक्षी महाडिक, माधुरी कोळी , राजेंद्र एडवनकर, आयुष हांडे, नरेंद्र सावंत, अनिकेत शिंदे, स्वप्नजा जाधव, शनी जाधव, विजया साळुंखे, नूतन लंके दत्तराज सकपाळ या कलाकारांनी आपापल्या एकपात्रीद्वारे आपल्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली. हितेश नेमाडे आणि परेश दळवी लिखित ‘डूबाईटी’या एकांकीकेमध्ये शिल्पा लाडवंते आणि ( शिल्पा ) परेश दळवी (कार्तिक) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एकांकिकेमधील कार्तिक आणि शिल्पा हे प्रेमी युगल संशयामुळे विभक्त होतात. पेशाने सेल्सगर्ल असलेली शिल्पा आपल्या व्यवसायचे निमित्त काढून मुद्दाम कार्तिकला भेटायला येते आणि दोघांची खरी शाब्दीक जुगलबंदी सुरू होते. यावेळी विभक्त झालेले असताना सुद्धा दोघांना एकमेकांबद्दलचे प्रेम निदर्शनास येण्यास वेळ लागत नाही आणि कथानकाच्या सरतेशेवटी त्यांच्यामधील डुबाईटी म्हणजे संशय संपून त्यांच्यातील प्रेमाचे नाते पुन्हा सुरळीत होते. आजच्या टेक्नोसाव्ही जगात नातेसंबंधात गैरसमज संशय यामुळे आलेला दुरावा हा फेसबुक व व्हॉटसअॅपचे स्टेटस बदलून नाही दूर होणार त्यासाठी दोन व्यक्तींमधील संवाद महत्वाचा आहे आणि त्यातूनच नाती जपली जाऊ शकतात याचे सार या एकांकिकेत मांडले गेले. दिग्दर्शक हितेश नेमाडे यांनी सदर एकांकिकेत कार्तिक आणि शिल्पातील दुरावलेल्या प्रेमाचा प्रवास वादाकडून सुसंवादाकडे होताना खूपच रंजकरित्या मांडला. सदर एकांकिकेची प्रकाशयोजना स्वप्नील माने आणि संगीत संयोजन हितेश नेमाडे यांनी सांभाळले. एकांकिके नंतर दिग्दर्शक व कलाकारांनी एकांकिके दरम्यानचे किस्से आणिअनुभव सांगितले. त्यानंतर अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला. पुढच्या रविवारी अभिनय कट्ट्याचे कलाकार एक विशेष सादरीकरण घेऊन येणार आहेत तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन किरण नाकती यांनी केले.