ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर प्रदीप कबरे यांच्या खिडकीचे अभिवाचन संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 05:07 PM2019-12-10T17:07:04+5:302019-12-10T17:09:17+5:30
अभिनय कट्टा म्हणजे ठाण्यातील कलारसिकांसाठी असलेली विविधरंगी कलाकृतींची मेजवानी.
ठाणे : एखादा कट्टा खळखळून हसवतो एखादा विचार करायला भाग पडतो पण प्रत्येक कट्टा कलाकाराला समाधान आणि रसिक मायबाप प्रेक्षकांना आनंद देऊन जातो. कट्टा क्रमांक ४५८ सुद्धा ठरला एक धम्माल कट्टा सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप कबरे ह्यांच्या लेखणीतून अवतारलेली 'खिडकी ' ह्या अभिवाचनाचा १० वा प्रयोग अभिनय कट्ट्यावर सादर झालाच पण सोबत अभिनय कट्ट्याच्या कलाकारांचं कल्पेश डुकरे लिखित नवनाथ कंचार दिग्दर्शित 'होम थिएटर' ह्या विनोदी नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
'खिडकी' आपल्या आयुष्यात असंख्य खिडक्या असतात. घराची ,ट्रेनची,बसची अशा विविध खिडक्या.अशीच एक मनाची खिडकी उघडल्यावर त्या खिडक्यातून आपल्याला अनुभवास येणाऱ्या विविध अनुभवांचं शाब्दिक चित्रण म्हणजे 'खिडकी'.अभिनेता लेखक प्रदीप कबरे ह्यांच्या अभिवाचनातून ही खिडकी उपस्थित प्रेक्षकांसमोर उलगडली गेली. प्रत्येक रसिक प्रेक्षकांना ती खिडकी कुठे न कुठे आपुलकीची वाटून गेली. सोबतच अभिनय कट्ट्याचे कलाकार प्रशांत सकपाळ, संदीप पाटील, वैभव जाधव, नवनाथ कंचार, रोहित आयरे, कल्पेश डुकरे, आदित्य नाकती आणि महेश झिरपे ह्यांनी सादर केलेल्या 'होम थिएटर' ह्या सादरीकरणातून हसत खेळत मनोरंजनातून डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं. सदर संहितेचे संगीत संयोजन प्रणव दळवी प्रकाशयोजना सहदेव साळकर ह्यांनी केली होती. आजचा कट्टा खरच वेगळा होता एक अनुभवी अभिनेता लेखकाच अभिवाचन आणि नवोदित कलाकारांचं विनोदी सादरीकरण. आज अभिनय कट्ट्यावर एक अनुभवी अभिनेत्याकडून सुंदर अभिवाचन ऐकण्यास मिळाले आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील खिडकीच महत्व आपल्याला अनुभवाचे मिळालं आणि कुठेतरी ते अभिवाचन प्रत्येकाच्या मनाच्या जवळच होत असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केलं.