आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत प्रगती अतकरेने पटकावला प्रथम क्रमांक
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 9, 2023 05:27 PM2023-10-09T17:27:25+5:302023-10-09T17:27:50+5:30
आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
ठाणे : कै.इंदिराबाई फणसे कोकण विभागीय आंतरमहाविदयालयीन वक्तृत्व स्पर्धेत अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय व क.महाविद्यालयातील प्रगती अतकरे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर माटुंग्यातील रामनिवास रुईया क.महाविद्यालयातील अनुष्का गांगल हिने दुसरा क्रमांक पटकावला व उत्स्फूर्त पारितोषिक विजेतीही ठरली आणि आदर्श विद्यामंदिर,बदलापूर येथील नेत्रा शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकावला. सूरज मुळ्ये(सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय,ठाणे), वैभवी किणी व तृप्ती भोसले(अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय,वसई), संस्कृती म्हात्रे व नेहा तायडे(माध्यमिक व क.महाविद्यालय,टेमघर,भिवंडी) या स्पर्धकांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली.
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविदयालयात ही स्पर्धा पार पडली. प्रथम पारितोषिकपात्र विजेत्यास आकर्षक फिरता स्मृतीचषक, चषक, प्रमाणपत्र, पुस्तक आणि रोख रक्कम रु.२५०१, द्वितीय पारितोषिकप्राप्त विजेत्यास आकर्षक चषक, प्रमाणपत्र, पुस्तक आणि रोख रक्कम रु.१५०१, तृतीय पारितोषिकपात्र विजेत्यास आकर्षक चषक, प्रमाणपत्र, पुस्तक आणि रोख रक्कम रु.१००१, उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना प्रमाणपत्र, पुस्तक आणि रोख रक्कम रु.७०१, उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक विजेत्यास प्रमाणपत्र, रोख रक्कम रु.३५०१ असे पारितोषिक देऊन गौरविले. तसेच, सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व पुस्तक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेकरिता नाट्यकलावंत, नाट्य परीक्षण लेखक, वर्तमानपत्र लेखक, कथालेखक डॉ.अनुप्रिया खोब्रागडे, कोमसापचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर हे परिक्षक होते.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख व कवयित्री डॉ.प्रज्ञा पवार, कोमसाप चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ, प्राचार्य डॉ.गणेश भगुरे, पर्यवेक्षक प्रा.राजेंद्र वेखंडे उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख प्रा.मनिषा राजपूत यांनी प्रास्ताविक, प्रा.हरेश्र्वर भोये यांनी सूत्रसंचालन तर उपप्रमुख प्रा.महेश कुलसंगे यांनी आभार प्रदर्शन केले. प्राचार्य डॉ. भगुरे यांनी महाविद्यालयाचा प्रगती अहवाल प्रेक्षकांसमोर ठेवला. संस्थेचे सचिव कमलेश प्रधान व खजिनदार सतीश शेठ यांनी स्पर्धेदरम्यान भेट दिली. या स्पर्धेत एकूण २२ कनिष्ठ महाविद्यालयांतील तब्बल ३९ विद्यार्थी सहभागी झाले होते. संस्थेचे खजिनदार शेठ, डॉ. भगुरे, पर्यवेक्षक राजेंद्र वेखंडे, प्रशासकीय उपप्राचार्य प्रा.दिनेश जोशी यांच्या हस्ते यशवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.