प्रकाश आंबेडकर, ओवेसींची बदलापुरातील सभा गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:40 AM2019-04-25T01:40:31+5:302019-04-25T01:40:52+5:30

कार्यकर्त्यांचा हिरमोड; हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी नाकारली

Prakash Ambedkar, changes in oveysi were wrapped up | प्रकाश आंबेडकर, ओवेसींची बदलापुरातील सभा गुंडाळली

प्रकाश आंबेडकर, ओवेसींची बदलापुरातील सभा गुंडाळली

Next

बदलापूर : भिवंडी लोकसभेचे उमेदवार डॉ. अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीने बदलापुरात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची सभा बुधवारी आयोजित केली होती; मात्र नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी न मिळाल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भरवशावरच सभा गुंडाळण्यात आली. रणरणत्या उन्हातही या सभेसाठी कार्यकर्ते जमले होते; मात्र नेते येणार नसल्याची खात्री झाल्यानंतर ते माघारी फिरले.

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी बदलापूरच्या सभेसाठी वेळ दिली होती. कसारा येथील सभा आटोपल्यावर दोन्ही नेते बदलापूरच्या सभेसाठी येणार होते. त्यानुसार, कार्यकर्त्यांची जमवाजमवदेखील झाली होती.

सभेची वेळ दुपारी १२ वाजताची होती; मात्र दुपारचे २ वाजले तरी नेते येत नसल्याचे पाहून, रणरणते ऊन डोक्यावर घेतलेल्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला. हळूहळू कार्यकर्त्यांनी घरचा रस्ता पकडण्यास सुरुवात केली. सभेसाठीची वेळ ही दुपारी २ वाजेपर्यंतची तोपर्यंत सभा आटोपणे बंधनकारक होते. अखेर, सभेच्या आयोजकांनी नेते मंडळी येणार नसल्याचे जाहीर करून स्थानिक पुढाऱ्यांची भाषणे सुरू केली.

दरम्यान, यासंदर्भात बदलापूर पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता, हेलिकॉप्टर उतरवण्याच्या परवानगीबाबत त्यांनी नकारात्मक अहवाल दिल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण दिले, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमांवर बोट ठेवले. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत परवानगी मिळवणे वंचित आघाडीच्या नेत्यांना शक्य झाले नाही.
दुसरीकडे, हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी नसतानाही स्थानिक पदाधिकारी नेत्यांची वाट पाहत बसले होते; मात्र दोन्ही नेते वसईला सभेसाठी जाणार असल्याने त्यांना बदलापूरला येणे शक्य झाले नाही. परवानगी मिळाली असती, तर ते दोन्ही नेते सभेसाठी येणार होते. मात्र, परवानगी नाकारल्याने त्यांनी कसाºयाची सभा आटोपून थेट वसई गाठली. तेथील सभेसाठीची वेळ दुपारी २ वाजेपर्यंतच असल्याने, ती आटोपून येणे नेत्यांना शक्य नव्हते.

सभेची पूर्ण तयारी झाली होती; मात्र हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी जाणीवपूर्वक देण्यात आली नाही. वसई येथील सभेच्या नियोजनानुसार ती आटोपल्यानंतरही नेत्यांना बदलापुरात येणे शक्य नव्हते. त्यामुळे नेत्यांच्या अनुपस्थितीत ही सभा घेण्यात आली.
- डॉ. अरुण सावंत, उमेदवार

हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी कसारा, भिवंडी या शहरांत परवानगी मिळालेली आहे; मात्र बदलापुरात परवानगीसाठी स्थानिक पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल नियमानुसार नकारात्मक होता. नियमांची पडताळणी केल्यानंतर, बदलापुरात सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी देणे शक्य झाले नाही.
- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी

Web Title: Prakash Ambedkar, changes in oveysi were wrapped up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.