राजकीय पक्ष काढल्याशिवाय ओबीसीना पर्याय नाही: प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 10:03 PM2022-04-11T22:03:49+5:302022-04-11T22:05:07+5:30
ओबीसीना आरक्षण देण्यास या सरकारची मानसिकता नसून आरक्षण मिळवण्यासाठी सत्ता काबीज करणे महत्वाचे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ओबीसीना आरक्षण देण्यास या सरकारची मानसिकता नसून आरक्षण मिळवण्यासाठी सत्ता काबीज करणे महत्वाचे आहे. त्यामुळे आरक्षणाचा लढा सुप्रीम कोर्टात योग्यरीत्या मांडण्यासाठी तसेच आपल्या न्याय हक्कासाठी राजकीय पक्ष स्थापन केल्याशिवाय पर्याय नाही असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आम्ही ओबीसीच्या पाठीशी आहोत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेणार नाही अशी घोषणा केली जाते. मात्र दुसरीकडे जिथे आरक्षणच नाही अशा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका घेतल्या जाणार,सत्तेपासून ओबीसीना वंचित ठेवण्याचा हा डाव असून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी आहे त्याच निवडणूका घेतल्या जात नसल्याबाबत त्यांनी ओबीसी समाजाचे लक्ष वेधले.
ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने प्रमुख निमंत्रक प्रफुल वाघुले यांच्यावतीने गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते. ओबीसीना सामाजिक ओळख मिळावी हा आमचा देखील प्रयत्न होता. तोच प्रयत्न या एकीकरण समितीच्या माध्यमातून होत असल्याबाबद्दल त्यांनी एकीकरण समितीचेही कौतुक यावेळी केले. आंबेडकर पुढे म्हणाले, आज जात जातनिहाय जनगणना झाली तर कितीतरी जाती अस्तत्वात नसल्याचे समोर येईल. अशा प्रकारची जनगणना झाली तरी स्वातंत्र्यनंतरही जो समाज सुरक्षित नाही,तो उठाव करून उठेल म्हणूनच ही जनगणना केली जात नाही,त्यामुळे जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला.
सत्ता कोणाचीही असो मात्र प्रामाणिकता पूर्णपणे संपली आहे. १२ पर्यंत आरक्षणाची गरज भासत नाही मात्र खरी आरक्षणाची गरज नंतर पडते. गेल्या ७० वर्षांच्या कालावधीत एज्युकेशन ऑफ चॉईस अशी परिस्थिती निर्माण करता आलेली नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखाद्या समाजाला दुर्लक्षित करणे ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे ओबीसीना स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करावे लागेल. आरक्षण मागून मिळणार नाही तर ते खेचून आणावे लागेल असे सांगत यासाठी ओबीसी समाजाला राजकीय पक्ष काढावाच लागेल असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला हरिभाऊ राठोड, विद्या चव्हाण तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध समाजातील घटकांना एकत्र आणण्यासाठी सर्वच स्तरातून पाठबळ मिळाले असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक प्रफुल वाघुले यांनी यावेळी सांगितले.