डोंबिवलीत एकाकी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे प्रल्हाद म्हात्रेंनी घेतले पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:07 PM2018-06-02T16:07:57+5:302018-06-02T16:07:57+5:30
डोंबिवली पश्चिमेतील विश्वनाथ भिकाजी सहस्रबुद्धे वयाच्या ८५व्या वर्षी एका खोलीच्या घरात एकटेच खितपत पडलेले असतांना त्यांना कल्याण डोंबिवली परिवहन समितीचे मनसेचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी आधार दिला. त्यांच्या वार्धक्याची जबाबदारी उचलत त्यांचे पालकत्व स्विकारले असून त्यांना नुकतेच गरिबाचा वाडा परिसरातील वृद्धाश्रमात ठेवण्यात आले.
डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील विश्वनाथ भिकाजी सहस्रबुद्धे वयाच्या ८५व्या वर्षी एका खोलीच्या घरात एकटेच खितपत पडलेले असतांना त्यांना कल्याण डोंबिवली परिवहन समितीचे मनसेचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी आधार दिला. त्यांच्या वार्धक्याची जबाबदारी उचलत त्यांचे पालकत्व स्विकारले असून त्यांना नुकतेच गरिबाचा वाडा परिसरातील वृद्धाश्रमात ठेवण्यात आले.
जीवन एक संघर्ष आहे. आणि हे असं संघर्ष असलं तरी संघषार्शी दोन हात करायला माणसाला कठीण काळात जिवाभावाची माणसं, वय आणि शरीराचीसुद्धा साथ हवी असते. यांशिवाय माणूस संघर्ष करू शकत नाही. तो हतबल होतो, मनाने कच खातो आणि शेवटी ज्या गोष्ठीचा स्वप्नातही विचार केला नाही, अशा अनाकलनीय गोष्टींसमोर तो शरणागती पत्करतो, नेमके तसेच काहीसे सहस्त्रबुद्धेंच्या बाबतीत घडल्याचे म्हात्रे म्हणाले. सहस्रबुद्धे ६५ वर्षांपासून डोंबिवलीत वास्तव्याला आहेत. तीसएक वर्षांपूर्वी त्यांच्या सहचारिणीचं निधन झाल्यानंतर ते एकाकी पडले.
कुणी,घर देता का रे? घर? असं म्हणत अख्खी रात्र डोंबिवलीतील रस्त्यावर काढत आश्रयासाठी याचना केली. ही बाब मनसेचे पश्चिमेकडील शाखाध्यक्ष संकेत तांबे यांच्या नीदर्शनास आली, त्यांनी सहस्त्रबुद्धे यांच्याशी संपर्क साधत विचारपूस केली. तेव्हा त्यांनी हतबल होत आसरा हवा असल्याचे सांगितले. तांबेनी लगेचच प्रल्हाद म्हात्रे यांच्याशी चर्चा केली. त्यानूसार म्हात्रेंनी तातडीने साधना आधार वृद्ध सेवा केंद्राच्या संचालिका सुमिधा थत्ते यांच्याशी संपर्क साधला आणि तत्काळ मासिक भाडे सात हजार भरून सहस्रबुद्धेंना आधार दिला. शुक्रवारी विश्वनाथ सहस्रबुद्धेंचं पालकत्व स्वीकारण्यासाठी वृद्धाश्रमातील जी कायदेशीर औपचारिकता हवी होती, ती डिपॉझिट भरून पूर्ण केली. त्यावेळी महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी अॅड. प्रदीप बावस्कर, विभागाध्यक्ष वेदप्रकाश पांडे, विजय शिंदे, संदीप उर्फ रमा म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते अजित लेले आदि उपस्थित होते.