मीरा रोडमधील प्राणिमित्र महिलेस तक्रारीनंतर घर करावे लागले रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 04:03 AM2021-02-06T04:03:25+5:302021-02-06T04:03:52+5:30

Mira Road News : भटके श्वान व मांजरांची सेवा करणाऱ्या शांतीनगर सेक्टर एकमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्राणिमित्र महिलेस गृहनिर्माण संस्थेच्या तक्रारीनंतर घर रिकामे करावे लागत असल्याचा प्रकार घडला आहे.

Pranimitra Mahila from Mira Road had to vacate her house after a complaint | मीरा रोडमधील प्राणिमित्र महिलेस तक्रारीनंतर घर करावे लागले रिकामे

मीरा रोडमधील प्राणिमित्र महिलेस तक्रारीनंतर घर करावे लागले रिकामे

Next

मीरा रोड : भटके श्वान व मांजरांची सेवा करणाऱ्या शांतीनगर सेक्टर एकमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्राणिमित्र महिलेस गृहनिर्माण संस्थेच्या तक्रारीनंतर घर रिकामे करावे लागत असल्याचा प्रकार घडला आहे. गृहनिर्माण संस्थेने या महिलेस दरमहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

प्राणिमित्र झारा नोरानी या भटके श्वान, मांजरी यांना खाऊ घालणे, त्यांना लस देणे, उपचार करणे आदी सेवा करीत आल्या आहेत. शांतीनगर सेक्टर १ च्या हर्षविहार, बी / ४१ मध्ये नोरानी गेल्या सहा ते सात वर्षांपासून भाड्याने राहतात. त्या सेक्टर १ व मीरा रोड परिसरातील श्वान, मांजरींची नियमित सेवा करतात. जखमी वा अपंग असलेल्या भटक्या मांजरींना उपचारासाठी आवश्यकता असल्यास त्या घरीच त्यांच्यावर उपचार करतात.

इमारतीच्या आवारात त्या भटक्या प्राण्यांना खाऊ घालत नसल्या तरी लळा लागलेल्या मांजरी इमारतीच्या आवारातही शिरतात. त्यातूनच इमारतीतील काही रहिवासी व झारा यांच्यात वादाला तोंड फुटले. इमारतीच्या आवारात भटके प्राणी घाण करतात म्हणून काही रहिवाशांच्या तक्रारी आहेत. तर मुक्या प्राण्यांना काय कळते, पण घाण केली तर मी स्वतः जाऊन साफ करत असल्याचे झारा यांचे म्हणणे आहे.

या वादातूनच सोसायटीने दरमहा एक हजारांचा दंड मेन्टेन्सच्या बिलात दोन वर्षांपासून आकारायला सुरुवात केली आहे. हा दंड कशाबद्दल आहे याचे कारण सोसायटीने लेखी दिलेले नाही. कारण स्पष्ट केल्याशिवाय हा दंड भरण्यास नकार दिला असल्याचे झारा म्हणाल्या. प्राण्यांबद्दल माणुसकी दाखविली पाहिजे. परंतु, सोसायटीच्या तक्रारींमुळे अखेर घरमालकानेही आपणास घर रिकामे करण्यास सांगितले आहे. १० फेब्रुवारीला घर रिकामे करणार असून दुसरीकडे घर शोधताना येथील प्राण्यांची देखभाल करणे कसे शक्य होणार? याची चिंता लागली असल्याचे त्या म्हणाल्या.  

सोसायटी अध्यक्षांचा बोलण्यास नकार
याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष रिंकीन पटेल यांच्याशी संपर्क साधला असता रविवारी सोसायटीची मिटिंग असून त्यात त्यांच्या घरमालकाने येऊन बोलावे, असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

Web Title: Pranimitra Mahila from Mira Road had to vacate her house after a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.