प्रवीण कुलकर्णी लिखीत ‘मीचि मज प्यालो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यात संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 05:05 PM2018-05-22T17:05:51+5:302018-05-22T19:53:58+5:30
आयपीएचच्यावतीने प्रवीण कुलकर्णी लिखीत ‘मीचि मज प्यालो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
ठाणे: आयपीएचच्यावतीने प्रवीण कुलकर्णी लिखीत ‘मीचि मज व्यालो’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी सायंकाळी सप्तसोपान डे केअर सेंटर येथे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ समुपदेशक डॉ. शुभा थत्ते, ज्येष्ठ समीक्षक डॉ. रेखा इनामदार, कवयित्री, लेखिका नीरजा, उन्मेष प्रकाशनच्या मेधा राजहंस, शिरीन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला.
सौमित्र कुलकर्णी यांनी गीत सादर करुन कार्यक्रमाची सुरूवात केली. लेखक प्रवीण कुलकर्णी यांनी आपले मनोगत मांडले. ते म्हणाले की, मला जे सांगायचे होते ते या पुस्तकात मी मांडले आहे. माझ्या आयुष्यातील निवडक घटना या पुस्तकात आहेत. या पुस्तकाचे लिखाण सुरू केले तेव्हा नेमके काय सांगायचे हा प्रश्न माझ्या समोर होता. हे आत्मचरित्र नाही तर मला नैराश्यात जाण्याचा अनुभव ते तिथून बाहेर पडण्याचा अनुभव याचा प्रवास आहे. हे आत्मशोध आहे. काय लिहायचं यापेक्षा काय टाळायचं हे मला जास्त महत्त्वाचे वाटले. डॉ. नाडकर्णी म्हणाले की, नैराश्य माणसाला जगण्यापासून परावृत्त करते. पण एक ड्राईव्ह असते की यातून बाहेर पडायचे, ड्राईव्ह आणि नॉन ड्राईव्हची मनात कुस्ती सुरू असते. मानसीक आरोग्य किंवा मानसीक आजार याबद्दल समाजात कलंक आहे असे असताना कुलकर्णी यांचे आत्मकथन पुढे येणे हे एक धैर्य आहे. हे पुस्तक वैयक्तीक पातळीवरचा लढा आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. रेखा इनामदार म्हणाल्या की, गेल्या १० ते १५ वर्षांत जागरुकता वाढल्याने शारिरीक - मानसीक अपंगतव् किंवा उणीवा अशावर लेखण करण्याची संख्या वाढलेली दिसत आहे. कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे की, चार - पाच व्याधींनी ग्रासलेले असताना ते या व्याधींना हसत खेळत सामोरे गेले. कवयित्री, लेखिका नीरजा म्हणाल्या की, पत्रं हा जुना प्रकार आहे. पत्रातला संवाद एकाशी असतो परंतू या पुस्तकातील लेखकाने सर्वांशी संवाद साधला आहे. कादंबरी होता होता राहिलेले हे पुस्तक आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ समुपदेशक डॉ. शुभा थत्ते यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. दरम्यान, प्रकाशक मोधा राजहंस यांनी मनोगत व्यक्त केले तर शिरीन कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा सांभाळली.