ठाण्यात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 01:09 AM2019-01-26T01:09:16+5:302019-01-26T01:09:23+5:30
मुंबई आणि औरंगाबाद ही दोन शहरे अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती ‘इसिस’ संशयित नऊ तरुणांच्या धरपकडीनंतर उघड झाली.
ठाणे : मुंबई आणि औरंगाबाद ही दोन शहरे अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती ‘इसिस’ संशयित नऊ तरुणांच्या धरपकडीनंतर उघड झाली. तसेच देशात घातपाती कारवायांचा काही अतिरेकी संघटनांनी इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या परिमंडळांमधील ३४ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच ठाणे ग्रामीणच्या परिसरातील सागरी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात खास टेहळणी आणि गस्ती पथके तैनात केल्याची माहिती सूत्रांनी
दिली.
ठाण्यात पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी आणि वागळे इस्टेट परिमंडळाचे उपायुक्त अविनाश अंबुरे तर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली
आहे.
मोक्याच्या ठिकाणांसह मुंब्रा, भिवंडी, राबोडी, कल्याण आणि ठाणे शहर तसेच मीरा रोड आणि भार्इंदर अशा संवेदनशील ठिकाणी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून सुरक्षा व्यवस्थेमध्येही वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी या शहरांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, लॉजेस आणि ढाब्यांची तपासणी करण्यात येत आहे. शहरात येणाऱ्या आणि जाणाºया मार्गांवरही नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे.
मार्केट, मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाºया कार्यक्रमांच्या ठिकाणी जलद प्रतिसाद दल, श्वानपथक, बीडीडीएसची पथकं गस्त घालत आहेत. सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेºयांद्वारेही संवेदनशील ठिकाणांवर लक्ष असल्याची माहिती सूत्रांनी
दिली.
नागरिकांनीदेखील भीती न बाळगता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच संशयास्पद वस्तूला हात लावू नये. एखादी व्यक्ती अथवा वस्तू संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले
आहे.
>प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मॉल, मार्केट आणि गर्दीच्या ठिकाणी तसेच चौकाचौकांमध्ये तपासणीही करण्यात येत आहे. हॉटेल, लॉज तसेच संशयास्पद ठिकाणीही पोलिसांकडून तपासणी करण्यात येत असून संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे.
- विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर