प्रांजळपणा हा ललित लेखनाचा आत्मा असतो. तो ललित लेखकानं जपला पाहिजे : अशोक बागवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 04:22 PM2019-06-03T16:22:26+5:302019-06-03T16:24:03+5:30
डॉ. अनुपमा उजगरे यांच्या बिलोरी कवडसे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
ठाणे : कविता ही सृजनाचा पहिला हुंकार असतो. कला हा आत्मा शुद्ध करणारा प्रांत आहे. कलारूपी वेगवेगळी झाडे असतील, पण मातीखाली सगळ्या झाडांची मुळं एकत्र येतात, तशा सर्व कला अशा सांस्कृतिक मंचावर एकत्र येणं हे आशावादी चित्र आहे. शहराचं सांस्कृतिक पर्यावरण शुद्ध राहण्यासाठी पुस्तक आदान प्रदान महोत्सवासारखे उपयुक्त आहेत.ललित लेखनामध्ये आव आणता येत नाही. ललित लेखनाचा वेग हा पाण्यासारखा प्रवाही असतो. ललित लेखक हा आपल्याबरोबर वाचकाला त्याच्या दुनियेत घेऊन जात असतो. प्रांजळपणा हा ललित लेखनाचा आत्मा असतो. तो ललित लेखकानं जपला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी केले. मराठी ग्रंथ संग्रहालय आणि व्यास क्रिएशन्स् आयोजित पुस्तक आदान प्रदान महोत्सवाच्या समारोप सत्रात ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे, डॉ. अनुपमा उजगरे, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अरूण म्हात्रे म्हणाले, साहित्याकडे घेऊन जाणारं पहिला अंग म्हणजे ललितलेख. मानसिक आंदोलनाचं तरल वर्णन ललित लेखात केलं जातं. कथा आणि कविता याचं अपत्य असलेल्या या ललितलेखांतील खरं मर्म डॉ. अनुपमा उजगरे यांच्या ललितलेखातून जाणवतं. आपली परंपरा ही ज्ञानोबा, तुकोबांची आहे. ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे, ती जपली गेली पाहिजे. ग्रंथ हेच मनावर निर्मळ उपचार करतात. जेव्हा मन निराश होते, दुर्दधर प्रसंग ओढवतात, तेव्हा शास्त्रीय संगीत आणि पुस्तके आधार देतात. ग्रंथ ही मनाची आणि समाजाची मशागत करतात. घरात जसं देवघराचं स्थान असतं, तसं पुस्तकांच्या कपाटालाही असलं पाहिजे. अशी घरंच समाज जीवंत असल्याचं लक्षण असतं. असा सुसंवाद ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर यांनी साधला.
कार्यक्रमाच्या विशेष सत्रात व्यास क्रिएशन्स् प्रकाशित आणि डॉ. अनुपमा उजगरे लिखित बिलोरी कवडसे या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शेवटच्या सत्राच्या सुरवातीला गायक आणि लेखक अनिरूद्ध जोशी यांची वृंदा दाभोळकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. तीन दिवस चाललेल्या पुस्तक आदान प्रदान महोत्सवात सुमारे 25 हजार हून अधिक पुस्तकांची देवाणघेवाण झाली असल्याचे व्यास क्रिएशन्स्चे संचालक नीलेश गायकवाड आणि मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी सांगितले. महेंद्र कोंडे यांनी निवेदन केले. ठाणे शहराच्या सांस्कृतिक जीवनाची मूळं घट्ट ठेवण्याचं काम मराठी ग्रंथ संग्रहालय आणि व्यास क्रिएशन्स् या संस्थांनी केलं आहे.