मद्याच्या आहारी गेलेल्या गरोदर बारबाला पत्नीची पतीनेच केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:06 PM2018-03-20T22:06:57+5:302018-03-20T22:06:57+5:30
भिवंडी : तालुक्यातील शेतकरी कुटूंबाने मुलाच्या हट्टापायी प्रेमप्रकरणा नंतर बारबालेशी रितीरिवाजा नुसार लग्न केले.ती गरोदर झाल्यानंतर तीची ओटी भरण्याचा कार्यक्रमही केला.तरी देखील गरोदर असताना ती मद्याच्या आहारी गेल्याने पतीने तिचा गळा दाबून हत्या केली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तीचा मृतदेह आपल्या घरामागील जमीनीत पुरल्याचे उघडकीस आल्याने परिसरांत खळबळ माजली आहे.
तालुक्यातील अनगाव येथे रहाणारा कल्पेश ठाकरे याचे सुमारे अडीच वर्षांपूर्वी मुंबईतील बारबाला माई हिच्याशी प्रेमसंबंध जुळून आले. या प्रेमसंबधानंतर त्यांनी रजीस्टर विवाह केला. ही बाब त्याच्या घरी कळाल्यानंतर कल्पेशच्या घरातील सर्वांनी दोघांचे रितीरिवाजानुसार लग्न करून दिले.या प्रसंगी राजस्थानवरून मुलीच्या घरातील कुटूंब आले होते.आनगावमध्ये रहात असताना या विवाहितेने संसाराची व समाजाची पर्वा न करता गरोदर स्थितीत ती दारू आणि सिगारेटच्या आहारी गेली. त्यामुळे ठाकरे कुटूंबांनी आंबाडी येथे दोघांना भाड्याने फ्लॅट घेऊन दिला. तेथे तीच्या दारू पिण्यावरून दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. त्यांचे भांडण विकोपाला गेल्यानंतर रविवारी रात्री दरम्यान कल्पेशने तीची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह आनगांव मधील घराच्या मागील जमीनीत पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच कल्पेश सुदाम ठाकरे याने गणेशपुरी पोलीस ठाण्यात आपली पत्नी माई ही सोमवार पासून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आणि तीचा शोध घेण्यासाठी पोलीसांकडे दगादा लावला.त्यामधून तपास सुरू असताना पोलीसांनी कल्पेशला पोलीसी हिसका दाखविताच त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले.त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह पुरलेली जागा पोलीसांना दाखविली. सोमवार रोजी सकाळी या जागेवर ग्रामिण पोलीस उप अधीक्षक काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर ढोबे यांनी घटनास्थळी पंच म्हणून नायब तहसीलदार प्रकाश पाटील आणि स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मातीत पुरलेला माईचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदना करिता स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलीसांनी कल्पेश ठाकरे यांस अटक केली आहे. आनगावातील प्रतिष्ठीत शेतकरी कुटूंबांनी केलेल्या सत्कर्माने मुलाचे भविष्य न बनता त्याची अखेर अशी झाल्याने परिसरांत दु:ख व्यक्त केले जात आहे.