कोरोनाग्रस्त गर्भवती सहा तास रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत; मनसे कार्यकर्त्याने दाखवली तत्परता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:46 AM2020-05-25T00:46:53+5:302020-05-25T06:40:21+5:30
कोपरहून ठाण्याला जाण्याचा सल्ला
कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील कोरोनाग्रस्त गर्भवतीला रुग्णवाहिका मिळावी, यासाठी पतीने शास्त्रीनगर रुग्णालयाला फोन केला. त्यावर रुग्णवाहिका उपलब्ध नसून महिलेला घेऊन ठाणे सिव्हिल रुग्णालय गाठण्याचा सल्ला प्रशासनाने दिला. त्यानंतर ही महिला सहा तास रुग्णवाहिकेची वाट पहात होती. मनसे कार्यकर्त्यांना हा प्रकार कळताच त्यांनी प्रशासनाला जाब विचारताच महिलेला घेण्यासाठी रुग्णवाहिका आली. या प्रकारामुळे पुन्हा महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीत कोरोनाबाधित तरुणालाही चालत येण्याचा सल्ला देण्यात आला होता. याप्रकरणी पालिका आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. मात्र, शनिवारी सायंकाळी कल्याणमधील एका ७१ वर्षीय कोरोना संशयित वृद्धाला न घेताच रुग्णवाहिकाचालक उपास सोडण्याचे कारण सांगून निघून गेला होता. या एकामागोमाग घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक चिंतित आहेत. त्यातच आता कोपरमधील कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीलाही रुग्णवाहिकेसाठी सहा तास वाट पाहावी लागली.
मनसेचे कार्यकर्ते ओम लोके आणि सागर मुळे यांना ही बाब कळताच त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली. नऊ महिन्याची गर्भवती असलेल्या या महिलेची प्रसूतीची तारीख जवळ आली आहे. तिच्या पतीने तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयाशी संपर्क साधला. तेव्हा रुग्णालयातून सांगण्यात आले की, आज महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या जास्त असून रुग्णवाहिका उपलब्ध नाही.त्यामुळे महिलेला शक्य असल्यास ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मुळे यांना याबाबत कळताच त्यांनी लोके यांच्या मदतीने खाजगी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.
मात्र, रुग्णालयाने खाजगी रुग्णवाहिकेला हरकत घेतली. कोविड पॉझिटिव्हसाठी कोविड रुग्णालयाची रुग्णवाहिका हवी. त्यानंतर लोके यांनी प्रशासनाला जाब विचारला असता सहा तासानंतर रुग्णवाहिका मिळाली. त्यातून महिलेने शनिवारी सायंकाळी ६ वाजता ठाणे सिव्हिल रुग्णालय गाठले.
कल्याण : कल्याण पूर्वेतील हनुमाननगरातील ७१ वर्षीय कोरोना संशयित रुग्णाला घेण्यासाठी रुग्णवाहिका गेली होती. रुग्णवाहिका चालकाची उपवास सोडण्याची वेळ झाल्याने तो निघून गेला. त्यानंतर १० मिनिटांतच दुसरी रुग्णवाहिका पाठविली होती, असा खुलासा कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने केला आहे.
वृद्धाच्या दोन मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या तिसºया मुलाने वडिलांना घेऊन जाण्यासाठी पालिकेकडे रुग्णवाहिका मागितली. रुग्णवाहिका आली; मात्र उपवास असल्याने हा रुग्ण येईपर्यंत वाट न पाहता चालक निघून गेला. तेथे १० मिनिटांत रुग्णवाहिका पाठवण्यात आली.
दरम्यान, या वृद्धाला स्ट्रेचर आणि खुर्चीवरून चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर आणण्यासाठी प्रत्यक्षदर्शींनी मदत न केल्याचा अजब खुलासा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, रुग्णाला घेण्यासाठी येणाºया वैद्यकीय पथकाकडे पीपीई किट असताना त्यांनी नागरिकांकडून मदतीची आपेक्षा का करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.