भिवंडीत गरोदर महिलेची झोळीत प्रसूती; बाळ दगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 07:06 AM2022-09-04T07:06:34+5:302022-09-04T07:07:44+5:30
आदिवासी पाड्यावर रस्ते कधी होणार, आमच्या कुटुंबातील चिमुकल्यांचे जीव जाणे कधी थांबणार, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून केला जात आहे.
नितीन पंडित -
भिवंडी : घरोघरी गौरीनिमित्त घरी आलेल्या माहेरवाशिणींचे कोडकौतुक सुरू असताना येथून ३० ते ४० किमी अंतरावर असलेल्या भिवंडी-वाडा मार्गावरील दिघाशी गावातील धर्मीचा पाडा येथील एका गरोदर मातेला मुख्य रस्त्यावर आणून रुग्णालयात नेण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने चादरीच्या झोळीतून घेऊन जात असताना झोळीतच या महिलेची प्रसूती होऊन बाळ दगावल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. शनिवारी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे दाहक वास्तव समोर आले.
दर्शना महादू फरले असे या दुर्दैवी मातेचे नाव आहे. १ सप्टेंबरला दर्शना यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. वज्रेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी दिघाशी गावातील स्थानिक नागरिकांनी चादरीची झोळी केली. त्यांना दवाखान्यात नेले जात असताना रस्त्यातच त्यांची प्रसूती झाली. मात्र, दर्शना यांचे बाळ दगावल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी जाहीर केले.
आदिवासी पाड्यावर रस्ते कधी होणार?
आदिवासी पाड्यावर रस्ते कधी होणार, आमच्या कुटुंबातील चिमुकल्यांचे जीव जाणे कधी थांबणार, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून केला जात आहे.
मागील वर्षी २२ सप्टेंबर, २०२१ रोजी धर्मी आजी या वृद्ध महिलेचा पाय मोडल्याने त्यांना लोखंडी पलंगावरून औषधोपचारासाठी नेले होते. धर्मी आजी यांच्या नावावरूनच या आदिवासी पाड्याला धर्मीचा पाडा हे नाव पडले. या आदिवासी पाड्यापासून मुख्य रस्त्यापर्यंतचा रस्ता बांधण्याची जुनी मागणी आहे.
मुख्य रस्त्यापासून धर्मीचा पाडा हे अंतर एक ते दीड किलोमीटर असून, रस्ता नसल्याने महिलेला आम्ही झोळीतून घेऊन गेलो. मात्र, रस्त्यातच प्रसूती झाली. दर्शना यांचे बाळ दगावले. गरोदर महिला अथवा रुग्णांना नेहमीच झोळीतून न्यावे लागते.
- आदेश रायात, रहिवासी, धर्मीचा पाडा.
गरोदर महिला २४ ऑगस्टला प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आली होती. तिची प्रकृती उत्तम होती, परंतु पाड्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने महिलेस चार दिवस अगोदर रुग्णालयात दाखल होण्याची सूचना केली होती, परंतु घरात तिची लहान मुले असल्याने तिने येणे टाळले. स्थानिक आशासेविका या गरोदर महिलेच्या सतत संपर्कात होती. मात्र, महिलेस अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. वाटेतच तिची प्रसूती झाल्याने महिलेचे बाळ दगावले.
- डॉ. माधव कवळे, आरोग्य अधिकारी, वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्र.
आदिवासी पाड्यावर रस्ताच नसल्याने मोठी गैरसोय