गर्भवतीला रुग्णालयातून हाकलले, अखेर घरीच दिला बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:42 AM2020-04-27T01:42:34+5:302020-04-27T01:42:50+5:30
अखेर घरी आल्यावर तिची प्रसूती झाली. बाळबाळंतीण सुखरूप असून अशा बेजबाबदार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी समाजसेवक शिवाजी रगडे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
उल्हासनगर : डॉक्टरांनी प्रसूतीची वेळ आली नसल्याचे कारण देत वेदनेने विव्हळणाऱ्या गर्भवतीला दोनदा हाकलवून लावण्याचा प्रकार शनिवारी मध्यवर्ती रुग्णालयात घडला. अखेर घरी आल्यावर तिची प्रसूती झाली. बाळबाळंतीण सुखरूप असून अशा बेजबाबदार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी समाजसेवक शिवाजी रगडे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं. ३ सम्राट अशोकनगरातील २६ वर्षीय महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने शनिवारी सकाळी ६ वाजता ती मध्यवर्ती रुग्णालयात गेली. त्या वेळी डॉक्टरांनी प्रसूतीची वेळ आली नाही, असे सांगून महिलेला घरी पाठविले. लॉकडाउनमुळे वाहन मिळत नसल्याने कसेबसे महिलेने घर गाठले. मात्र दुपारी ३ वाजता पुन्हा वेदना सुरू झाल्याने महिला पुन्हा मध्यवर्ती रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी तपासणी न करता प्रसूतीची वेळ झाली नसल्याचे कारण सांगून महिलेला घरी हाकलवून दिले. अखेर गर्भवतीने बाळाला जन्म दिला.
मध्यवर्ती रुग्णालयात २४ वर्षीय अभियंता तरुणीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे जीव गेल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य संचालक आदींकडे पाठपुरावा केला आहे. मध्यवर्ती रुग्णालयातील शनिवारचा प्रकार उघड झाल्यावर रगडे यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आरोग्य विभागाचे संचालक आदींकडे तक्रारी करून कारवाईची मागणी केली.
>...म्हणून दुर्लक्ष झाले असावे : मध्यवर्ती रुग्णालयात अपुरे डॉक्टर व कर्मचारी वर्ग असून काही डॉक्टरांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यामुळे महिलेकडे दुर्लक्ष झाले असावे, असा तर्क लावून चौकशी करण्याचे आश्वासन वैद्यकीय अधिकारी डॉ. जाफर तडवी यांनी दिले.