गरोदर महिलेची दालखिचडीने भागविली पहाटेच्या सुमारास भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:42 AM2021-05-27T04:42:19+5:302021-05-27T04:42:19+5:30

ठाणे : शासकीय रुग्णालय म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. परंतु, कोरोनाकाळात ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे ...

The pregnant woman's appetite was quenched in the morning | गरोदर महिलेची दालखिचडीने भागविली पहाटेच्या सुमारास भूक

गरोदर महिलेची दालखिचडीने भागविली पहाटेच्या सुमारास भूक

Next

ठाणे : शासकीय रुग्णालय म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. परंतु, कोरोनाकाळात ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे कोरोना रुग्णांसह इतरांसाठी तारणहार ठरल्याचे अनेक उदाहरणे समोर आली आहेत. असेच आणखी एक उदाहरण नुकतेच समोर आले. पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास नऊ महिन्यांची गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने रुग्णालयात दाखल झाली. मातृत्वापुढे कोरोनाचे संकट तिला किरकोळ वाटले. परंतु, सायंकाळपासून पोटात अन्नाचा कण नसल्याने ती भुकेने काकुळतीला आली होती. हे तेथील डॉक्टर पुष्कराज रसाळ यांनी हेरले. त्यानंतर रुग्णालयाच्या किचनपासून ते बाहेर कुठे काही खाण्यासाठी मिळते का, यासाठी धावाधाव करून अखेर पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास डिलिव्हरी बॉय दाल-खिचडी घेऊन आला आणि त्या मातेची भूक भागली.

बदलापूर येथील रिया नामक (नाव बदलले आहे) महिला नऊ महिन्यांची गरोदर असल्याने त्यांच्या पायाला सूज आली होती. या आलेल्या सुजीमुळे त्यांना नीट उभे राहता येत नव्हते किंवा चालताही येत नव्हते. शेजाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी त्यांना बदलापूर येथील स्थानिक रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना ठाणे, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार खासगी वाहनांनी शेजाऱ्यांच्या मदतीने ३८ किलोमीटर प्रवास करून त्या कळवा रुग्णालयात आल्या. या वेळी सुरुवातीला कोरोनाचाचणी केली. त्यांचा अहवाल रात्री उशिरा आला. त्यामध्ये ती पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यावर तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानुसार, नातेवाईक आणि शेजारी साधारण पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात रुग्णवाहिकेने दाखल झाले. त्या वेळी कर्तव्यावर डॉ. पुष्कराज रसाळ होते. त्यांनी कोणताही विलंब न करता, त्या महिलेला उपचारासाठी भरती करून उपचार सुरू केले. याचदरम्यान डॉ. रसाळ यांना तिच्या चेहऱ्यावरील व्याकुळपणा आणि अंगातील अशक्तपणा जाणवला. त्यांनी “तुम्ही काही खाल्ले आहे का,” असा प्रश्न केला. त्यावर त्या माउलीने कित्येक तास काही खाल्ले नसल्याचे सांगितले. डॉ. रसाळ यांनी महिला वॉर्डमध्ये जेवणाच्या थाळीबद्दल विचारणा केली. मात्र, त्या वेळी काही नव्हते. मग रुग्णालयाच्या किचनमध्ये चौकशी केली. तर तेथेही काही नसल्याचे समोर आले. त्याच वेळेस परिचारिका सायली मोरे यांनी नेत्रालय इमारतीमधून एक बिस्कीटचा पुडा आणला. पण, त्याने पोट भरणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी रुग्णालयाच्या परिसरातील रात्री उघड्या असणाऱ्या हॉटेलचे नंबर जस्ट डायल केले. सुरुवातीला कोणी फोन उचलत नव्हते. ८ ते १० नंबर लावल्यानंतर दोघा-तिघांनी फोन उचलले. परंतु, तेथे पिझ्झाव्यतिरिक्त काही नव्हते. हे पदार्थ महिलेच्या पायाला आलेल्या सुजेच्या दृष्टीने योग्य नव्हते. त्यातच आणखी एक नंबर डायल केल्यावर येथे दालखिचडी मिळेल, असे समोरून सांगण्यात आले. त्यानुसार ऑर्डर दिली. त्यानंतर जवळपास सव्वापाच वाजण्याच्या सुमारास चेतन नामक डिलिव्हरी बॉय दालखिचडी घेऊन आला. त्याला पैसे देऊन डॉक्टरांनी तातडीने ती दालखिचडी त्या महिलेला खाऊ घातली. अशा प्रकारे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची माणुसकी पुन्हा एकदा दिसून आली.

.....

ती महिला अशक्त असल्याचे पाहून सहज विचारले. त्यानंतर तिने काहीच खाल्ले नसल्याचे समजले. त्यानंतर पोटात असलेल्या बाळासाठी तिच्या पोटात अन्नाचे कण जे महत्त्वाचे असल्याने क्षणाचाही विलंब न लावता तिला दालखिचडी उपलब्ध करून दिली. तिच्यासह तिच्या बाळाला काही न होणे हाच यामागचा उद्देश होता.

- डॉ. पुष्कराज रसाळ, जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे

Web Title: The pregnant woman's appetite was quenched in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.