गर्भवती महिलेचा रिपोर्ट 2 दिवसांतच निगेटिव्ह, कोरोना अहवाल देणाऱ्या लॅबवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 04:48 PM2020-07-18T16:48:51+5:302020-07-18T16:58:20+5:30
उल्हासनगरात दोन दिवसात गर्भवती महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह, कोरोना अहवाल देणाऱ्या लॅबवर प्रश्नचिन्ह
उल्हासनगर : एका गर्भवती महिलेचा कोरोना रिपोर्ट दोन दिवसात निगेटिव्ह आल्याने, कोरोना अहवाल व कोरोना स्वाब तपासणी करणाऱ्या लॅबच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. समाजसेवक नासीर खान यांनी अश्या रिपोर्ट देणाऱ्या लॅब, डॉक्टर व रुग्णालय यांच्यात निर्माण झालेल्या साखळीची चौकशी करण्याची मागणी महापालिकेकडे केली.
उल्हासनगर कॅम्प नं -३ शांतीनगर परिसरात राहणारी २२ वर्षीय गर्भवती महिलेला सावधगिरी म्हणून त्यांच्या स्त्रीरोगतंज्ञ डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महिलेने गोलमैदान येथील स्थानिक लॅब मध्ये जावून ११ जुलैला कोरोना चाचणीसाठी स्वाब दिला. १२ जुलैला कोरोना अहवाल पोझीटीव्ह आल्याने, महिलेसह कुटुंबाला धक्का बसला. कोणतेही लक्षणे नसतांना अहवाल पोझीटीव्ह आला असा? असा प्रश्न कुटुंबाला पडला. त्याच दिवसी १२ जुलैला महापालिका आरोग्य विभागाचे पथक उपचारासाठी कोरोना रुग्णालयात घेवून जाण्यासाठी महिलेच्या घरी आले. महिलेसह कुटुंबानी महापालिका आरोग्य पथकाला पुन्हा कोरोना चाचणी करतो. असे सांगून परत पाठविले. १३ जुलैला महिलेच्या कुटुंबाने पूर्वीच्या गोलमैदान येथील स्थानिक लॅबला फोन करून कोरोना चाचणी साठीच्या स्वाब घेण्यासाठी घरी बोलावले. दोन दिवसापूर्वी कोरोना चाचणी केली. यांची माहिती लॅबला दिली नाही.
गोल मैदान येथील स्थानिक लॅबने १४ जुलै रोजी महिलेचा स्वाब कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी कोरोना पोझीटीव्ह अहवाल देणारी लॅबने, दुसऱ्या दिवसी कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगितले. या प्रकाराने महिलेसह कुटुंबांना धक्का बसला. घाबरलेल्या महिलेसह कुटुंबांनी त्यांच्या सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती समाजसेवक नासीर खान यांना दिली. महापालिका आरोग्य विभागाला झालेल्या प्रकाराबाबत नासिर खान यांनी माहिती दिल्यावर, वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास मोहनालकर यांनी माहिती घेवून कारवाईची संकेत दिले. या प्रकाराने कोरोना अहवाल व लॅबच्या विश्वासार्हतावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. डॉक्टर, लॅब व रुग्णालय यांची एक साखळी निर्माण झाली असून रुग्णाची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप नासिर खान यांनी केला.
सदर प्रकारची करणार चौकशी
गर्भवती महिला सोबत झालेल्या प्रकारची माहिती मागवून चौकशी करण्याचे संकेत महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास मोहणलकरं यांनी दिली. तसेच असे प्रकार यापूर्वी झाले का? याचीही माहिती घेत असल्याचे सांगून कारवाईचे संकेत दिले.