मेट्रो-५ मार्गिकेच्या उल्हासनगरपर्यंत विस्तारासाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 01:36 AM2019-10-27T01:36:43+5:302019-10-27T01:36:55+5:30
मेट्रो-५ मार्गिकेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे
मुंंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ मार्गिकेचा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करते आहे. याबाबतचे प्राथमिक सर्वेक्षण एमएमआरडीएने सुरू केले आहे.
मेट्रो-५ मार्गिकेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण या २४.९ किमी मार्गिकेच्या सविस्तर अहवालाला राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या मार्गिकेसाठी सुमारे ८ हजार ४१६ कोटी ५१ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. १७ स्थानके असलेल्या या मार्गासाठी बनवण्यात आलेल्या अहवालामध्ये कोन परिसरामध्ये कारडेपो उभारण्याचा विचार होता. मात्र कृषी उत्पन्न बाजारपेठेची जागा दिल्यास शेतकऱ्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भीती वर्तवल्यामुळे या जागेचा मुद्दाही बारगळला. कोन परिसरातील १५ हेक्टर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, त्यालाही स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता मेट्रो कारशेडची जागा भिवंडीतील गोवे येथे हलविण्याचा निर्णय झाला आहे.
कारशेडसाठी बेस्टच्या आणिक आगाराची निवड
आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरून वाद निर्माण झाल्याने एमएमआरडीएने मेट्रो ५साठी प्रस्तावित असलेले कारशेड आरेबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे कारशेड वडाळा येथील बेस्टच्या आणिक आगारामध्ये उभारले जाणार आहे.