स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:46 AM2021-08-17T04:46:29+5:302021-08-17T04:46:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील नियोजन भवन आवार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रानभाज्या प्रदर्शन व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील नियोजन भवन आवार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रानभाज्या प्रदर्शन व पदार्थ विक्री महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रदर्शनाचे उद्घाटन नगरविकासमंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या महोत्सवात जिल्ह्यातील तब्बल ५० बचत गटांच्या महिलांनी सहभाग घेऊन रानभाज्यांपासून तयार केलेल्या रुचकर, खरपूस पदार्थांची आगळीवेगळी मसालेदार चव ठाणेकरांनी रविवारी चाखली.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून विविध प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने प्रदर्शन व पदार्थ विक्री या महोत्सवात करण्यात आली. पाऊस असतानाही ठाणेकर खवय्यांची मांदियाळी यावेळी पाहायला मिळाली. आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वनोत्पादनावर अवलंबून आहे, त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान महत्त्वाचे आहे, या करिता जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी ही संकल्पना अवलंबण्याचे महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे धोरण आहे. त्यास अनुसरून या रानभाज्या महोत्सवास ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी या रानभाज्यांची पाककला स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. यात सुमारे ५० महिला व बचत गटांनी सहभाग घेऊन विविध प्रकारच्या रानभाज्यांची चव चाखण्याची संधी सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली. यावेळी जिल्हा परिषद, कृषी विभाग व इतर विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचारी यांचा महोत्सवांमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. रानभाज्या महोत्सव ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
....... फोटो आहे